मुंबई : उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार मुंबई महानगरातील नोंदणीकृत फेरीवाल्यांना क्यू आर कोड आधारित ओळखपत्र वितरित करण्यास मुंबई महापालिकेने सुरुवात केली आहे. दिनांक १ जून २०२६ पासून महानगरपालिकेच्या २६ प्रशासकीय विभाग कार्यालयात ओळखपत्र दिले जात आहे.
मुंबई महापालिकेच्या वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून फेरीवाल्यांचा विषय गाजतो आहे. मुंबई महापालिकेत सत्तेवर आल्यानंतर लगेचच महापौर रितू तावडे यांनी बांग्लादेशी फेरीवाल्यांना हटवण्याची घोषणा केली होती. फेरीवाल्यांना क्यू आर कोड ओळखपत्र देण्याची बहुचर्चित प्रक्रिया अखेर सुरु झाली आहे.
मुंबईतील एकूण ९९ हजार ४३५ पैकी २० हजार नोंदणीकृत पथविक्रेत्यांची पडताळणी पूर्ण झाली आहे. उर्वरित नोंदणीकृत पथविक्रेत्यांनी दिनांक २६ जून २०२६ पर्यंत संबंधित विभाग कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून अर्जाची पडताळणी करावी. तसेच, क्यू आर कोड आधारित ओळखपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. विहित मुदतीनंतर पडताळणी अथवा क्यू आर कोड आधारित ओळखपत्र वितरित करता येणार नसल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील २६
विभाग कार्यालयात नोंदणीकृत पथविक्रेत्यांची यादी नावासह प्रदर्शित करण्यात आली आहे. संबंधित प्रशासकीय विभागातील लोकप्रतिनिधी, संघटनेचे प्रतिनिधी, निवडून आलेले पथविक्रेता प्रतिनिधी यांना सुध्दा संबंधित यादी वितरीत करण्यात आली आहे. त्यानुसार, नोंदणीकृत पथ विक्रेत्यांना नोंदणी अर्जावरील दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून त्यांना प्रशासकीय विभाग कार्यालयात प्रत्यक्ष हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, पडताळणी करून क्यूआर कोड आधारित ओळखपत्र घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
नोंदणीकृत पथ विक्रेत्यांनी अर्जाची पोचपावती, आधारकार्ड मूळ प्रत आणि दोन पारपत्र आकाराची छायाचित्रे समवेत आणावीत, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. विहित मुदतीनंतर पडताळणी अथवा क्यू आर कोड आधारित ओळखपत्र वितरित करता येणार नाही, असेदेखील महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
