मुंबई : बेस्टच्या ताफ्यातील बसची संख्या कमी झाली असून त्यातच कडक उन्हाचे चटके सोसत बसची वाट पहात ताटकळणाऱ्या मुंबईकरांना वातानुकूलित बसमध्ये चढल्यानंतरही गारेगाव प्रवास दुरापास्त होत आहे. अनेक वातानुकूलित बसमधील वातानुकूलित यंत्रणेत बिघाड, तर काही बसमध्ये गारेगार हवेचा अभाव असतो. बसमधील वातानुकूलित यंत्रणेच्या मुद्यावरून प्रवासी आणि चालक-वाहक यांच्यात वाद होऊ लागले आहेत. उपनगरीय रेल्वे पाठोपाठ बेस्टमधून सर्वाधिक प्रवासी प्रवास करतात. शहर आणि उपनगरात दररोज सुमारे २५ लाख प्रवासी बेस्टने ये – जा करतात. रिक्षा-टॅक्सीच्या तुलनेत बसचा प्रवास स्वस्त असल्याने प्रवाशांकडून बसला प्राधान्य देण्यात येते आहे. वातानुकूलित बसमुळे प्रवाशांना दिलासा मिळत असला तरी सध्या बहुतांश बसमधील वातानुकुलित यंत्रणा कुचकामी ठरत असल्याने प्रवासी घामाघूम होत आहेत.

महिन्याला जवळजवळ तीन ते सव्वा तीन कोटी मुंबईकर बेस्टच्या बसमधून प्रवास करतात. बस कमी, त्यात रस्त्यावर जागोजागी खोदकाम केल्यामुळे होत असलेली वाहतूक कोंडी अशा विविध कारणांमुळे बस फेऱ्यांना उशीर होतो. त्यातच बसमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होतात. विक्रोळी, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी, मरोळ, कुर्ला, गोवंडी, दक्षिण मुंबईसह नवी मुंबईत धावणाऱ्या बेस्टच्या बसमधील वातानुकूलित यंत्रणा बंद किंवा कमी असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून करण्यात येत आहेत. कमी अंतराच्या मार्गावर वातानुकूलित बसमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. प्रत्येक अर्ध्या मिनिटाला प्रवासी बसमध्ये चढतात आणि उतरतात. बसचा दरवाजा वारंवार उघड – बंद केला जात असल्याने, तसेच जास्त प्रवासी घेतल्यामुळे वातानुकूलित यंत्रणा योग्यरीत्या चालत नाही, असे बेस्टचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. बेस्टच्या ताफ्यात १ हजार २९२ बस विद्युत वातानुकूलित आहेत.

प्रवाशांचा संताप

उपक्रमाला वातानुकूलित बसच्या देखभालीचा भार सोसवत नसेल तर अशा बस सेवेत आणून प्रवाशांची गैरसोय का केली जाते, असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित करण्यात येत आहे. प्रवाशांकरिता जुन्याच बस चांगल्या होत्या. वातानुकूलित बसचे तिकीट काढतो, मात्र तांत्रिक बिघाडामुळे गर्दी आणि उकाड्याचा त्रास सहन करावा लागतो. अनेकदा बसमधील वातानुकूलित यंत्रणा बंद असूनही दरवाजे उघडे ठेवले जात नाहीत. त्यामुळे गुदमरल्यासारखे होते, अशी व्यथा काही प्रवाशांनी मांडली.

कंत्राटदारांचा निष्काळजीपणा

बेस्टच्या ताफ्यातील सुमारे ८० टक्के बस खासगी कंत्राटदारांकडून भाडेतत्त्वावर चालवल्या जात आहेत. बसच्या देखभालीची जबाबदारी कंत्राटदारांची असते. मात्र बसच्या देखभालीबाबत हयगय केली जात आहे. कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.

वाढीव रेंजसाठी ‘एसी’ बंद?

उपक्रमातील वातानुकूलित बस या विद्युत असून, या गाड्यांचे ॲव्हरेज (रेंज) कमीच असते. त्यामुळे गाड्यांची रेंज वाढविण्यासाठी, बसमधील बॅटरी जास्त वेळ टिकावी, यासाठी कंत्राटी चालक बसमध्ये मुद्दामहून वातानुकूलित यंत्रणा बंद किंवा कमी ठेवतात, असा आरोप प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

बेस्टने स्वमालकीच्या विनावातानुकूलित बसगाड्या तत्काळ विकत घेणे गरजेचे आहे. वातानुकूलित गाड्यांमधून प्रवास करणे प्रवाशांना गैरसोयीचे होत आहे. त्यामुळे बेस्ट प्रवासी कायमचा उपक्रमापासून दूर होऊन अन्य पर्याय निवडण्याची शक्यता आहे.- रूपेश शेलटकर, अध्यक्ष, आपली बेस्ट आपल्याचसाठी

उन्हाची तीव्रता वाढली आहें. त्यातच बसमध्ये गर्दी असेल तर वातानुकूलीत यंत्रणा कमी असल्याचे वाटते. एखाद्या बसमध्ये बिघाड असू शकतो. बिघाड असलेली बस दुरुस्त केली जाते.- सुचेता उतळे, जनसंपर्क अधिकारी, बेस्ट