मुंबई महापालिकेतील भाजपच्या सर्व ८९ नगरसेवकांना गेल्या आठवड्यात सभागृहात अनुपस्थित राहिल्याबद्दल नोटीस बजावण्यात आली आहे. सत्ताधारी पक्षाचे पुरेसे नगरसेवक सभागृहात उपस्थित नसल्यामुळे ‘तातडीचे कामकाज’ म्हणून आणलेला प्रस्ताव संख्याबळाअभावी मंजूर करता आला नाही. विरोधकांनी संख्याबळाच्या जोरावर हा प्रस्ताव नामंजूर करण्यास भाग पाडले. ही नामुष्की भाजप पक्षश्रेष्ठींच्या जिव्हारी लागली असून सर्वच्यासर्व नगरसेवकांना सोमवारपर्यंत या प्रश्नी खुलासा करावा लागणार आहे.

मुंबई महापालिकेच्या सभागृहात भाजप आणि शिवसेना(शिंदे) महायुतीचे बहुमत असले तरी गेल्या आठवड्यात गुरुवारी कामकाजात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांनाच चितपट केले. ‘तातडीचे कामकाज’ म्हणून आणलेला प्रस्ताव विरोधकांनी बहुमताने फेटाळला. पक्षादेश काढलेला असतानाही नगरसेवक वेळेत न पोहोचल्यामुळे सत्ताधाऱ्यांवर नामुष्की ओढवली. विरोधकांनी एकजूट दाखवत तातडीच्या कामकाजाला संख्याबळाने विरोध केला. वडाळ्यातील एक भूखंड विकासकाला देण्याबाबतच्या प्रस्तावासह तातडीचे कामकाज म्हणून आणलेले प्रस्ताव सत्ताधाऱ्यांना बाजूला ठेवावे लागले.

महासभेच्या पटलावरचा हा पराभव सत्ताधारी भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला असून पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार सभागृह नेते गणेश खणकर यांनी सर्व ८९ नगरसेवकांना नोटीसा बजावून त्यांच्याकडून खुलासा मागितला आहे. या प्रकरणी सर्वच नगरसेवकांना नोटीस बजावण्यात आली आहे. दोन दिवस आधी नगरसेवकांना वेळेवर उपस्थित राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रत्येकाला किती वाजता सभागृहात आलात, उशीर का झाला याबाबत स्पष्टीकरण मागवण्यात आले असल्याची माहिती खणकर यांनी दिली.

दरम्यान, गेल्या आठवड्यात सभागृहात अर्थसंकल्पावर चर्चा सुरू होती. सकाळी ११ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. त्यामुळे उपनगरात लांब राहणाऱ्या नगरसेवकांना घरी पोहोचणे, सकाळी पुन्हा लवकर निघणे शक्य होत नव्हते, असे काही नगरसेवकांचे म्हणणे आहे. मात्र पक्षादेश पाळलाच पाहिजे अशी भूमिका सभागृहनेत्यांनी व्यक्त केली आहे.

विरोधक सावध, सत्ताधारी गाफील ….

तातडीचे कामकाज म्हणून आणलेले प्रस्ताव मंजूर करण्यासाठी सत्ताधारी पक्षाने पक्षादेश (व्हिप) बजावला होता. मात्र भाजपचे अनेक नगरसेवक सभागृहात पोहोचलेच नव्हते. विरोधी बाकांवरील काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नगरसेवक सभागृहात हजर होते. विरोधकांनी यावेळी पालिका अधिनियमाचा आधार घेत मतदानाची मागणी केली. तसेच स्वाक्षरीच्या आधारे मतमोजणी करण्याची मागणी केली. तेव्हा सत्ताधाऱ्यांचे ६१ नगरसेवक होते. तर विरोधकांचे संख्याबळ ५८ होते. एक तृतीयांश संख्याबळ न झाल्यामुळे सत्ताधाऱ्यांना हार पत्करावी लागली. मुंबई महापालिकेत सत्ताधारी महायुतीमध्ये भाजपचे ८९ आणि शिवसेना (शिंदे) पक्षाचे २९ आणि राष्ट्रवादीचे चार असे सत्ताधाऱ्यांचे १२२ चे संख्याबळ असताना नामुष्कीची वेळ सत्ताधाऱ्यांवर आली.

आम्ही कधी तातडीचे कामकाज अडवले नाही …

याआधीच्या कार्यकाळात भाजपने पहारेकरी म्हणून भूमिका बजावली होती. त्यावेळी आम्ही कधीही तातडीचे कामकाज अडवले नव्हते. आता विरोधकांनी ही नवीनच प्रथा पाडल्याचा आरोपही खणकर यांनी केला आहे.