मुंबई : बृहन्मुंबई महानगर पालिका क्षेत्रातील रुग्णालयांना बोगस, पात्रता नसलेल्या डॉक्टरांचा पुरवठा केल्या प्रकरणी संबंधित ठेकेदराला काळ्या यादीत टाकले आहे. ठेकेदाराने देयके राखून ठेवले असून, ठेकेदाराला कारणे दाखला नोटीस बजावली आहे. तसेच बाह्यस्त्रोताद्वारे उपलब्ध करून घेण्यात येणाऱ्या डॉक्टरांच्या सेवा सप्टेंबर २०२५ पासून बंद करण्यात आल्या आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. या बाबतचा प्रश्न अस्लम शेख, विजय वडेट्टीवार, अमिन पटेल, विश्वजित कदम आदींनी उपस्थितीत केला होता. त्याला शिंदे यांनी लिखित उत्तर दिले.
ब्रहृन्मुंबई महानगरपालिकेने अकरा उपनगरीय रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या सेवा उपलब्ध करून घेतल्या होत्या. त्यापैकी सांताक्रूझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयात दोन डॉक्टराची आणि बोरीवली येथील भगवती रुग्णालयात एका डॉक्टरची पदवी परदेशी असल्याचे निदर्शनास आले होते. घाटकोपर येथील संत मुक्ताबाई रुग्णालयात एका डॉक्टरची पदवी बीएचएमएस असल्याचे निदर्शनास आले होते. या प्रकरणी संबंधित ठेकेदारांना कारणे दाखवा नोटीस बजावून, त्यांची सेवा खंडीत करण्यात आली आहे.
त्यांना काळ्या यादीत टाकून, त्यांची देयके राखून ठेवण्यात आली आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबर २०२५ पासून बृहृन्मुंबई महापालिकेच्या अकरा उपनगरीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील बाह्यस्त्रोताद्वारे घेण्यात येणाऱ्या सेवा बंद केल्या आहेत. समाधनकारक उत्तर न देणाऱ्या ठेकेदारांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे, असेही शिंदे यांनी लिखित उत्तरात म्हटले आहे.
