bmc budget 2023 budget of mumbai municipal corporation tomorrow mumbai print news zws 70 | Loksatta

मुंबई महापालिकेचा उद्या अर्थसंकल्प; ५०,००० कोटींवर आकारमान?

सर्वात श्रीमंत महानगरपालिका असा नावलौकीक असलेल्या मुंबई महानगर पालिकेचा अर्थसंकल्प येत्या शनिवारी जाहीर होणार आहे.

bmc-675
(संग्रहित छायचित्र)/ लोकसत्ता

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेचा सन २०२३-२४ चे अर्थसंकल्प शनिवारी पालिका मुख्यालयात सादर होणार आहे. प्रशासकीय राजवटीतील हा अर्थसंकल्प कसा असेल, पालिकेची निवडणूक लवकरच अपेक्षित असल्यामुळे निवडणूकीच्या तोंडावर कोणत्या नवीन घोषणा होणार याबाबतही उत्सुकता आहे. यंदा अर्थसंकल्पाचे आकारमान पन्नास हजार कोटींच्या आसपास जाण्याची शक्यता आहे.

सर्वात श्रीमंत महानगरपालिका असा नावलौकीक असलेल्या मुंबई महानगर पालिकेचा अर्थसंकल्प येत्या शनिवारी जाहीर होणार आहे. पालिका अधिनियमानुसार ५ फेब्रुवारीपर्यंत पालिकेचा अर्थसंकल्प सादर करावा लागतो. दरवर्षी पालिकेच्या नियमानुसार शिक्षण विभागासाठी स्वतंत्र अर्थसंकल्पा सादर केला जातो. त्यानंतर मुख्य अर्थसंकल्पाचे सादरीकरण होत असते. दरवर्षी अतिरिक्त आयुक्त हे शिक्षण समिती अध्यक्षांना शिक्षण अर्थसंकल्प सादर करतात.पालिका आयुक्त हे स्थायी समिती अध्यक्षांना अर्थसंकल्प सादर करतात. मात्र यंदा पालिकेची व नगरसेवकांची मुदत संपलेली असल्यामुळे व अद्याप निवडणूक झालेली नाही. त्यामुळे अर्थसंकल्प प्रशासकीय स्तरावरच सादर होणार आहे.

यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे या शिक्षण खात्याचा अर्थसंकल्प प्रशासक (महानगरपालिका) डॉ. इकबाल सिंह चहल यांना सादर करतील. त्यानंतर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू हे बृहन्मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प प्रशासक (महानगरपालिका) डॉ. इकबाल सिंह चहल यांना सादर करणार आहेत.

गेल्या वर्षी २०२२-२३ मध्ये ४५,९४९.२१ कोटी आकारमान असलेला अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. त्यात यंदा वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्थसंकल्प ५० हजार कोटींच्या जवळ जाण्याची शक्यता आहे. काही वर्षांपूर्वी माजी पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी आर्थिक शिस्त लावत अर्थसंकल्पाचे आकारमान कमी केले होते. गरजेपुरत्या तरतुदी करून अर्थसंकल्पाला आलेला फुगवटा दूर केला होता.

आरोग्यावर भर..

अर्थसंकल्प तयार करताना मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेतानाच त्यांना सुशासनाचा अनुभव यावा यासाठी  उपाययोजनांचा समावेश करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 02:36 IST
Next Story
मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना करा ; मुख्यमंत्र्यांचे महापालिका आयुक्तांना आदेश