मुंबई : श्रीमंत महानगरपालिका अशा ख्याती असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा आगामी २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प उद्या बुधवारी २५ फेब्रुवारी रोजी सादर केला जाणार आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक झाली असून नवीन महापालिका आणि स्थायी समिती आणि शिक्षण समिती स्थापन झाली आहे.

त्यामुळे बुधवारी शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प आणि एकूण अर्थसंकल्पीय अंदाज सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या एकूण आर्थिक स्थितीचा अंदाज येणार आहे. गेल्यावर्षी अर्थसंकल्पाचे आकारमान ७४ हजार कोटीपेक्षा अधिक होते. यंदा त्यात वाढ होण्याची शक्यता असून अर्थसंकल्पाचा हा फुगवटा ८० हजार कोटींवर जाण्याची शक्यता आहे. भाजपच्या राजवटीतील हा पहिलाच अर्थसंकल्प असल्यामुळे त्याबाबत उत्सुकता आहे.

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प दरवर्षी ४ फेब्रुवारीला सादर होतो. मात्र, यावेळी ४ फेब्रुवारीला मुंबई महापालिकेची नुकतीच निवडणूक झाली होती व स्थायी समिती स्थापन झाली नव्हती. त्यामुळे अर्थसंकल्प सादर करण्यास मुदतवाढ मिळावी अशी विनंती पालिका प्रशासनाने राज्य सरकारकडे केली होती. त्यानुसार यावेळी २० दिवस उशीरा अर्थसंकल्प सादर होणार आहे.

मुंबई महापालिकेचा शिक्षण विभागाचा स्वतंत्र अर्थसंकल्प असतो. तो सर्वात आधी सादर केला जातो. त्यानंतर मुख्य अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केला जातो. त्यानुसार महापालिका मुख्यालयात प्रारंभी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे हे शिक्षण खात्याचे अर्थसंकल्पीय अंदाज नवनियुक्त शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांना सादर करतील. त्यानंतर महापालिका आयुक्त भूषण गगराणी हे मुंबई महानगरपालिकेचा मुख्य अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर करतील. स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना हा अर्थसंकल्प सादर केला जाईल.

भाजपच्या राजवटीतील पहिला अर्थसंकल्प

मुंबई महापालिकेवर गेली पंचवीस तीस वर्षे एकसंघ शिवसेना व भाजपची सत्ता होती. या काळात अर्थसंकल्पावर शिवसेनेचाच अधिक प्रभाव होता. तर गेली चार वर्षे मुंबई महापालिकेची मुदत संपल्यामुळे प्रशासकीय राजवट होती. त्यामुळे पालिका आयुक्तांनीच अर्थसंकल्प सादर केला होता. यावेळच्या निवडणूकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असून यंदाच्या अर्थसंकल्पावर भाजपची छाप असणार हे नक्की. त्यामुळे या अर्थसंकल्पात कोणत्या नवीन घोषणा होणार याबाबत उत्सुकता आहे.

८० हजार कोटींवर जाणार

चालू आर्थिक वर्षात मुंबई महापालिका प्रशासनाने ७४,४२७ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. आधीच्या वर्षी ६५,१८० कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. त्यामुळे चालू अर्थसंकल्पात १४.१९ टक्के वाढ झाली होती. यंदाही अर्थसंकल्पाचे आकारमान वाढणार असल्याची चर्चा आहे.

मुंबई महापालिकेने हजारो कोटींचे मोठमोठे प्रकल्प हाती घेतले असून अडीच लाख कोटींपेक्षा अधिकचे दायित्व पालिकेवर आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाचे आकारमान वाढणार आहे, यात शंका नाही. तसेच भाजपच्या राजवटीतील हा पहिला अर्थसंकल्प असल्यामुळे त्यांच्यासाठीही हा प्रतिष्ठेचा अर्थसंकल्प असेल. गेल्यावेळी इतकी वाढ झाली नाही तरी अर्थसंकल्पाचे आकारमान वाढणार आहे यात शंका नाही.

मुदतठेवींचा अंदाज येणार

या अर्थसंकल्पातून पालिकेच्या आर्थिक स्थितीचा अंदाजही येणार आहे. श्रीमंत महानगरपालिका अशी ख्याती असलेल्या मुंबई महापालिकेची आर्थिक स्थिती खालावू लागली आहे. जकात बंद केल्यानंतर महसूलाचे नवे मोठे स्रोत उभे करण्यात पालिका प्रशासनाला अपयश आले आहे. दुसरीकडे प्रकल्पांसाठी राखीव निधीला हात घातल्यामुळे मुदतठेवीही कमी होऊ लागल्या आहेत. ९१ हजार कोटींवर असलेल्या मुदतठेवी चालू अर्थसंकल्पात ८१ हजार कोटींपर्यंत कमी झाल्या होत्या. या मुदतठेवी आणखी कमी होण्याची शक्यता असून त्याबाबतची खरी माहिती अर्थसंकल्पात मिळू शकणार आहे.