कामाची ठिकाणे, खुली मैदाने व उद्याने या ठिकाणी राबवणार कार्यक्रम

मुंबई : शहरातील नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी मुंबई महानगरपालिकेने २०२६-२७ या आर्थिक वर्षामध्ये ‘फिट मुंबई’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमांतर्गत व्यक्तिगत व सामाजिक स्तरावर कामाची ठिकाणे, खुली मैदाने व उद्याने या ठिकाणी आरोग्यदायी जीवनशैली व उत्तम प्रकृतीबाबत मुंबई महानगरपालिकेकडून जनजागृती करण्याबरोबरच विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

बदलत्या जीवनशैलीमुळे नागरिकांना अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. मधुमेह, रक्तदाब व अन्य असंसंर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे या प्रतिबंध करण्यासाठी केंद्र सरकारने राबविलेल्या ‘फिट इंडिया’ उपक्रमाच्या धर्तीवर मुंबईमध्ये ‘फिट मुंबई’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘ॲक्टिव्ह’ म्हणजे ‘सक्रिय समाज, सक्रिय नागरिक आणि सक्रिय वातावरण’ या या संकल्पनेशी सुसंगत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

‘फिट मुंबई’ या उपक्रमातून मुंबईतील नागरिकांच्या व्यक्तिगत व सामाजिक स्तरावर कामाची ठिकाणे, खुली मैदाने व उद्याने येथे आरोग्यदायी जीवनशैली व उत्तम प्रकृतीबाबत जनजागृती करण्याबरोबरच नागरिकांना उत्तम आरोग्याबाबत माहिती व्हावी यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना दिली. ‘फिट मुंबई’ या उपक्रमामुळे मुंबईतील नागरिकांना आरोग्याबाबत जागरुक करण्यारोबरच त्यांचे आरोग्य सुदृढ होण्यास मदत होणार आहे. तसेच ‘फिट इंडिया’ उपक्रमाप्रमाणे ‘फिट मुंबई’ या उपक्रमालाही मुंबईतील सर्वच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभेल असा विश्वासही महानगरपालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग व इतर असंसर्गजन्य रोगांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन त्याच्या प्रतिबंधासाठी मुंबई महानगरपालिकेच्या विविध नागरी आरोग्य केंद्रात राबविण्यात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. जेणेकरून या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांपर्यंत हा उपक्रम पोहचवणे शक्य होऊन तय्ांना या उपक्रमाचा लाभ हाेण्यास मदत होईल.

शहरातील १०० महाविद्यालयांमध्ये राबविणार उपक्रम सध्याची तरुणाई ही पाश्चिमात्य जीवनशैलीचा अंगिकार झपाट्याने करत आहे. त्यामुळे तरुणांनी सुदृढ आणि आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारावी यासाठी महाविद्यालयांमध्ये ‘फिट मुंबई’ उपक्रमांतर्गत ”आरोग्यदायी वातावरण” उपक्रम सुरु करण्यात येणार आहे. सुरुवातील हा उपक्रम मुंबईतील १०० महाविद्यालयांमध्ये राबविण्यात येणार आहे. तसेच हा उपक्रम सामाजिक व्यावसायिक बांधिलकी निधीच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. त्यामुळे या उपक्रमाचा कोणताही अतिरिक्त ताण पडणार नाही.