मुंबई: मुंबई महापालिकेच्या विकासनिधीच्या वाटपात सत्ताधारी भाजपने काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या नगरसेवकांवर अन्याय केल्याचा आरोप आहे. मात्र आता भाजपच्याच काही नगरसेवकांना कमी निधी मिळाला आहे. विशेष म्हणजे मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सहा नगरसेवकांना मिळून तब्बल ३९ कोटींचा निधी देण्यात आला आहे.
मुंबई महापालिकेच्या सन २०२६-२७ चा ८०,९५२ कोटींच्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी देताना, स्थायी समितीला ८०० कोटींचा विकास निधी उपलब्ध करून दिला. या विकासनिधीचे वाटप करताना सत्ताधारी भाजपने महायुतीच्या प्रत्येक नगरसेवकाला किमान सव्वादोन कोटी ते वीस कोटी असा निधी दिला, तर काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या नगरसेवकांना केवळ २५ लाखांचा विकासनिधी दिल्याबद्दल विरोधकांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र भाजपने आपल्याच नगरसेवकांच्याबाबतही भेदभाव केला आहे.
भाजपच्या बहुतांशी नगरसेवकांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचा विकास निधी देण्यात आला आहे. सर्वाधिक निधी सभागृह नेते गणेश खणकर यांना २० कोटी इतका मिळाला आहे. तर स्थायी समितीच्या सदस्यांना ३ कोटींचा निधी देण्यात आला आहे. तर काही मोजक्या नगरसेवकांना ५ कोटींचा निधी देण्यात आला आहे. तर शिवसेना (शिंदे) पक्षाचे गटनेते अमेय घोले आणि बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांना प्रत्येकी १० कोटींचा विकासनिधी देण्यात आला आहे. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प महासभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला असून गेल्या काही दिवसांपासून त्यावर सभागृहात चर्चा सुरू आहे.
या विकासनिधीच्या वाटपात मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या अंधेरी पश्चिम मतदारसंघाला झुकते माप देण्यात आले आहे. या मतदारसंघात एकूण सहा नगरसेवक असून यापैकी पाच नगरसेवकांना प्रत्येकी सहा कोटी विकासनिधी देण्यात आला आहे. तर रोहन राठोड हे साटम यांचे निकटवर्ती असून त्यांना ९ कोटींचा निधी देण्यात आला आहे.
विरोधकांची नाराजी
ज्या नगरसेवकांना जास्तीचा निधी दिला त्यांच्या प्रभागात सोन्याची कौले लावण्यात येणार असल्याची टीका विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. तर विकासनिधीच्या वाटपातील भेदभाव म्हणजे त्या प्रभागातील मतदारांवर अन्याय असल्याची टीका नगरसेवक अंकित प्रभू यांनी केली आहे. तर विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना पुरेसा निधी द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे गटनेते अश्रफ आजमी यांनी केली आहे.
आम्ही कोणावरही अन्याय केलेला नाही .विरोधकांना एक कोटींचा नगरसेवक निधी दिलेलाच आहे. यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनीदेखील भाजपच्या नगरसेवकांना निधी दिला नव्हता. त्यांनी अशाच पद्धतीने निधीचे वाटप केले होते. आम्ही काहीच वेगळे केलेले नाही. प्रत्येकाच्या प्रभागाची गरज आणि प्रकल्पाचा विचार करून हा निधी वितरित केला आहे. – गणेश खणकर, सभागृह नेते
अमित साटम यांच्या मतदारसंघातील नगरसेवक
प्रभाग क्रमांक …नगरसेवक …निधी
६८ …रोहन राठोड …९ कोटी
६५ …विठ्ठल बंदेरी ….६ कोटी
६७ ..दीपक कोतेकर …६ कोटी
६९ ….सुधा सिंग ….६ कोटी
७१ …सुनीता मेहता ….६ कोटी
७० …अनिश मकवानी …६ कोटी
