मुंबई : विकासनिधीच्या वाटपात सत्ताधारी पक्षाला झुकते माप देण्याची प्रथा यंदा महायुतीने कायम ठेवली आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे) पक्षाच्या नगरसेवकांना किमान दोन कोटी ते २० कोटींपर्यंतचा विकासनिधी देण्यात आला आहे. शिवसेना (ठाकरे) आणि कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेवकांना अवघा २५ लाखांचा विकास निधी देऊन त्यांची अक्षरश: बोळवण केली आहे. या एवढ्याशा निधीतून प्रभागात विकासाची कामे कशी करायची असा प्रश्न या नगरसेवकांना पडला आहे.

मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७ चा तब्बल ८०,९५२ कोटींच्या अर्थसंकल्पाला सोमवारी स्थायी समितीने मंजूरी दिली तेव्हा स्थायी समितीला ८०० कोटींचा विकास निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. सत्ताधारी भाजप आणि शिवसेना (शिंदे) महायुती या विकासनिधीचे वाटप कसे करणार, कोणत्या पक्षाला किती निधी मिळणार, शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या नगरसेवकांना किती निधी मिळणार याबाबत उत्सुकता होती. मात्र या निधी वाटपात महायुतीने शिवसेना (ठाकरे) आणि कॉंग्रेस या दोन पक्षांना अक्षरश: शुल्लक विकासनिधी दिला आहे.

महापालिकेतील सत्ताधारी भाजपा-शिवसेना (शिंदे) महायुतीने विरोधकांना केवळ २५ लाख रुपये विकास निधी दिला आहे. दुसरीकडे महायुतीच्या नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील विकास कामांसाठी प्रत्येकी किमान सव्वा दोन कोटी रुपये आणि जास्तीत जास्त विकास निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे सत्ताधारी महायुतीच्या नगरसेवकांना आपल्या विभागातील रखडलेली कामे करणे शक्य होणार आहे.

राष्ट्रवादीलाही भरघोस निधी ..

महायुतीला राष्ट्रवादी (अजित पवार) व राष्ट्रवादी (शरद पवार) नगरसेवकांनी पाठिंबा दिल्यामुळे त्यांना दोन ते तीन कोटी रुपये विकास निधी देण्यात आला आहे. समाजवादी पक्षाच्या नगरसेवकांनाही दोन कोटी रुपयांपर्यंत निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना व एमआयएमच्या गटनेत्यांना दोन कोटी रुपये विकासनिधी देण्यात आला आहे. त्यांच्या नगरसेवकांना २५ लाख रुपये निधी दिला आहे. गटनेता म्हणून शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या किशोरी पेडणेकर यांनाही दोन कोटींचा निधी दिला आहे.

प्रशासक काळातही विरोधकांना कमी निधी

गेली चार वर्षे मुंबई महापालिकेवर प्रशासकांची सत्ता होती. या काळात राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर या काळातही विकासनिधीचे वाटप करताना पालकमंत्र्यांच्या शिफारसीनुसार आमदारांच्या पातळीवर विकासनिधी देण्यात आला होता. त्यामुळे जिथे शिवसेना(ठाकरे) पक्षाचे किंवा कॉंग्रेसचे आमदार आहेत तेथील प्रभागात निधी मिळाला नव्हता. तेव्हाही केवळ भाजप आणि शिवसेना (शिंदे) पक्षाच्या माजी नगरसेवकांनाच निधी मिळाला होता.

प्रमुख नगरसेवकांना मिळालेला निधी

  • राजेश्री शिरवडकर – १० कोटी, भाजपा</li>
  • विशाखा राऊत – २५ लाख, शिवसेना ठाकरे
  • आश्रफ आजमी – २ कोटी, काँग्रेस
  • आशा काळे – २५ लाख, काँग्रेस
  • किशोरी पेडणेकर – – २ कोटी, शिवसेना ठाकरे (गटनेता)
  • यशवंत किल्लेदार – २ कोटी, मनसे
  • विजय उबाळे – २ कोटी, एमआयएम (गटनेता)
  • डॉ सईदा खान – ३ कोटी, राष्ट्रवादी काँग्रेस
  • गणेश खणकर – २० कोटी, भाजपा
  • अमय घोले – १० कोटी, शिवसेना (गटनेता)
  • प्रभाकर शिंदे – २ कोटी ५० लाख, भाजपा
  • अजित रावराणे – २ कोटी २५ लाख, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार
  • रितू तावडे – २ कोटी २५ लाख, भाजपा
  • संजय घाडी – १० कोटी