मुंबई : अर्थसंकल्पावरील चर्चेसाठी बोलवण्यात आलेल्या मुंबई महापालिकेच्या महासभेत गुरुवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावरून चांगलेच रणकंदन पेटले. विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी बाळासाहेबांचा अवमान केल्याचा दावा करत भाजप आणि शिवसेना (शिंदे) महायुतीने पेडणेकर यांनी माफी मागावी अशी मागणी लावून धरली. तर आपण काहीही चुकीचे बोललो नाही असा दावा करीत पेडणेकर या देखील माफी न मागण्यावर ठाम होत्या. त्यामुळे संध्याकाळी उशीरापर्यंत सभागृहाचे कामकाज रोखून धरण्यात आले होते. अखेर बाळासाहेबांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेने सभा तहकूब केली.
विविध सरकारी कार्यक्रमांमध्ये मुंबईच्या महापौर पदाचा अवमान होत असल्याचा हरकतीचा मुद्दा शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या ज्येष्ठ नगरसेविका विशाखा राऊत यांनी उपस्थित केला. या मुद्द्याला समर्थन देताना विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतले. यावेळी त्यांनी बाळासाहेबांचा अवमान केल्याचा दावा करीत सभागृह नेते गणेश खणकर यांनी किशोरी पेडणेकरांनी माफी मागण्याची मागणी केली. तसेच किशोरी पेडणेकर यांचे एक दिवसासाठी निलंबन करावे अशी मागणीही त्यांनी केली. यानंतर वादाची ठिणगी पडली व मूळ चर्चा बाजूला पडली.
भाजप, शिवसेना (शिंदे) पक्षाने किशोरी पेडणेकर यांनी माफी मागावी यासाठी सभागृहात जोरदार मागणी केली. तर शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या नगरसेवकांनीही पेडणेकर यांच्या बाजूने सभागृहात घोषणा दिल्या. त्यामुळे काही काळ सभागृहात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. किशोरी पेडणेकर यांनी माफी मागावी असे निर्देश महापौर रितू तावडे यांनी दिले असता पेडणेकर या सभागृहात उठून बाहेर निघून गेल्या. त्यामुळे या वादात आणखीनच भर पडली.
नक्की काय बोलल्या किशोरी पेडणेकर?
बाळासाहेबांना आम्ही विकत घेतले नाही असे वाक्य किशोरी पेडणेकर यांनी उच्चारल्याचा दावा महायुतीच्या नगरसेवकांनी केला आहे. मात्र आपण असे बोललोच नाही असे किशोरी पेडणेकर यांचे म्हणणे आहे. बाळासाहेबांचे विचार विकले गेले असे आपण म्हणालो होतो, असा दावा पेडणेकर यांनी केला आहे. महापालिका सभागृहात नगरसेवकांच्या भाषणांचे ध्वनिमुद्रण (रेकॉर्डिंग) करण्याची सोय नाही. नगरसेवकांची भाषणे चिटणीस विभाग केवळ नोंदवून घेत असतात. त्यामुळे पेडणेकर नक्की काय बोलल्या हे आता गुलदस्त्यातच आहे.
नाक घासून माफी मागा – उपमहापौर संजय घाडी
शिवसेनाप्रमुखांच्या अवमानाचा मुद्दा सभागृहात भाजपने अधिकच लावून धरला. मात्र सभागृह संपल्यानंतर शिवसेना (शिंदे) पक्षाच्या सर्व नगरसेवकांसह उपमहापौर संजय घाडी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी पेडणेकर यांच्या वक्त्यव्याने शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या असून त्यांनी नाक घासून माफी मागितली पाहिजे अशी मागणी केली. तसेच महापालिका कायद्यातील कलम ३६(अ) नुसार त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशीही मागणी घाडी यांनी केली आहे.
कोणाच्या सांगण्यावरून माफी मागणार नाही
बाळासाहेबांच्या अवमान प्रकरणामुळे सभागृहाचे कामकाज बराचवेळ रोखून धरल्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी मध्येच हस्तक्षेप केला. मोठे मन करून माफी मागा, माफी मागितल्यामुळे कोणी लहान होत नाही असे आवाहन स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी केले. मात्र माझी चूक असती तर मी हजारवेळा माफी मागितली असती. पण कोणाच्या सांगण्यावरून मी माफी मागणार नाही अशी भूमिका पेडणेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
पेडणेकर यांना स्वपक्षीयांनी एकटे पाडले?
दरम्यान, पेडणेकर यांना विरोधी पक्षनेते केल्यापासून त्यांच्या पक्षात नाराजी आहे. गुरुवारी महासभेत झालेल्या प्रकरणात ठाकरेंच्या अनेक नगरसेवकांंनी छुपेपणाने भाजपच्या रणनीतीला पाठिंबा दिल्याची चर्चा आहे. माफी मागण्याचे आदेश महापौरांनी देताच सभागृहात एकच शांतता पसरली. तेव्हा पेडणेकर या एकट्या पडल्याचे चित्र उभे होते.
