मुंबई : मुंबई महापालिकेच्या सभागृहात अर्थसंकल्पाच्या चर्चेदरम्यान गुरुवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या नावाच्या उल्लेखावरून मोठा गदारोळ झाला. विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांचे निलंबन करण्याची मागणी सत्ताधाऱ्यांनी लावून धरली, मात्र किशोरी पेडणेकर यांनी शेवटपर्यंत माफी मागितली नाही. त्यामुळे शुक्रवारी या मानापमान नाट्याचा दुसरा अंक बघायला मिळेल अशी अपेक्षा होती.

मात्र शुक्रवारी सभागृहात अर्थसंकल्पावरील चर्चा सुरू होती. दोन्ही बाजूने या वादावर पडदा पडल्याचे चित्र होते. विरोधी पक्षनेत्याचे निलंबन करणाऱ्यांची मागणी करणाऱ्यांनीही आपल्या तलवारी म्यान केल्या होत्या.

मुंबई महापालिकेत २५ ते ३० वर्षे सत्तेत असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेला हटवून भाजप आणि शिवसेना (शिंदे) महायुतीने सत्ता स्थापन केली. ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक विरोधी पक्षात बसले आहेत. मात्र पालिकेची स्थापना झाल्यापासून दरवेळी पालिका महासभेत शह-काटशहाच्या राजकारणाला ऊत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई महापालिकेच्या सभागृहात अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे. त्यातच गुरुवारी सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकमेकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.

दिवंगत आशा भोसले यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी महापौरपदाचा मान न राखता त्यांना दुसऱ्या रांगेत स्थान दिल्याबद्दल शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या ज्येष्ठ नगरसेविका विशाखा राऊत यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी झालेल्या चर्चेत किशोरी पेडणेकर यांनी शिवसेनाप्रमुखांचा अवमान केल्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षाने पेडणेकर यांनी माफी मागावी अशी मागणी केली. या मागणीसाठी सत्ताधाऱ्यांनीच दिवसभर सभागृहाचे कामकाज न करता केवळ प्रतिष्ठेचा मुद्दा तापवत ठेवला.

किशोरी पेडणेकर यांच्या निलंबनाची मागणी सत्ताधारी पक्षाने लावून धरली. यावेळी झालेल्या भाषणांदरम्यान भाजपाचे प्रकाश दरेकर यांनीही अपशब्द वापरला. त्यामुळे विरोधी पक्षालाही या शब्दाचे आयते कोलीत हाती मिळाले. त्यामुळे आधी दरेकर यांनी वापरलेला शब्द कामकाजातून काढा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. त्यामुळे दोन्ही बाजूनी शह-काटशहाची स्पर्धा सुरू होती. या राजकारणात अर्थसंकल्पाची चर्चा बाजूलाच राहिली. पेडणेकर यांनी शेवटपर्यंत माफी न मागितल्यामुळे अखेर गुरुवारी कामकाज तहकूब करण्यात आले होते.

शुक्रवारी कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर आता पुढे काय होणार याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये उत्सुकता होती. मात्र सभागृह सुरू झाले तेव्हा विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर उपस्थित नव्हत्या. महापौर रितू तावडे यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला सुरूवात करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर नगरसेवक अंकित प्रभू यांनी आपल्या भाषणाला सुरूवात केली. थोड्या वेळानंतर किशोरी पेडणेकर या सभागृहात आल्या. मात्र काल काही झालेच नाही अशा पद्धतीने सुरळीतपणे कामकाज सुरू होते. त्यामुळे दोन्ही बाजूने वादावर पडदा पडला असल्याची चर्चा सुरू होती.

विरोधी पक्षनेत्याचे निलंबन शक्य नाही ?

मुंबई महानगरपालिका अधिनियम ३६ अ अंतर्गत त्यांचे निलंबन करता येते असा दावा सत्ताधारी पक्षाने केला होता. मात्र या नियमाखाली विरोधी पक्षनेत्यांचे निलंबन करता येत नाही. त्यामुळे अखेर सत्ताधारी पक्षालाही आपला बाणा बाजूला ठेवावा लागला. दोन्ही बाजूने आपापली प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी अखेर या वादावर पडदा पडला आणि अर्थसंकल्पाच्या चर्चेला पुन्हा एकदा सुरूवात झाली.