मुंबई : कशेळी (भिवंडी) ते मुलुंड जकात नाक्यादरम्यान पाणी वहन करण्यासाठी जलबोगद्याचे बांधकाम वेगाने सुरू असून ७.१ किलोमीटर अंतरादरम्यान पाणी वहन करण्यासाठी हा जलबोगदा तयार केला जात आहे. या अंतर्गत मुलुंड जकात नाका येथे १३४ मीटर खोलीचा लॉन्चिंग शाफ्ट उभारण्यात येत आहे. जलबोगद्यांद्वारे पाणी वहन केल्यामुळे गळती तसेच वितरणातील अपव्यय यावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवता येणार असल्याचा विश्वास महापालिकेने व्यक्त केला आहे.

जगातील सर्वात मोठ्या पाणीपुरवठा योजनांपैकी मुंबईची पाणीपुरवठा व्यवस्था अग्रगण्य मानली जाते. पाणीपुरवठ्यासाठी जलबोगद्यांचे बांधकाम करणारी मुंबई महानगरपालिका ही भारतातील पहिली स्थानिक स्वराज्य संस्था आहे. सुमारे १०० किलोमीटर लांबीचे जलबोगदे असलेले मुंबई महानगर हे जगातील दुसरे शहर ठरते. जलवितरण व्यवस्थेतील एक व्यवहार्य व प्रभावी पर्याय म्हणून जलबोगद्यांचा वापर केला जात आहे. कशेळी (भिवंडी) ते मुलुंड जकात नाक्यादरम्यान पाणी वहन करण्यासाठी सुरू असलेल्या जलबोगद्याच्या बांधकामाची महानगरपालिका आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी यांनी नुकतीच पाहणी केली.

भातसा या जलस्त्रोताचे पाणी हे मुंबई- २ आणि मुंबई – ३ या दोन मुख्य जलवाहिन्यांद्वारे मुंबई महानगरापर्यंत आणले जाते. वाढत्या नागरीकरणामुळे ठाणे शहरामधील विविध विकास कामांना या जलवाहिन्यांचा अडथळा होत आहे. यामुळे उपरोक्त दोन जलवाहिन्यांची पातळी खाली सरकविण्याबाबत ठाणे महानगरपालिकेद्वारे महानगरपालिका प्रशासनाला विनंती करण्यात आली होती. मुंबई महानगराची पिण्याच्या पाण्याची सतत वाढणारी मागणी लक्षात घेता महानगरपालिकेने कशेळी ते मुलुंड जकात नाक्यापर्यंत जलबोगदा बांधण्याचे निश्चित केले आहे. हे काम सप्टेंबर २०२४ पासून प्रगतिपथावर आहे.

कशेळी (भिवंडी) ते मुलुंड जकात नाका दरम्यान ७.१ किलोमीटर अंतरादरम्यान पाणी वहन करण्यासाठी जलबोगदा तयार करण्यात येत आहे. या अंतर्गत मुलुंड जकात नाका येथे १३४ मीटर खोलीचा लॉन्चिंग शाफ्ट उभारण्यात येत आहे. आतापर्यंत शाफ्टचे उत्खनन कार्य १३० मीटर खोलीपर्यंत पूर्ण झाले आहे. तर, बोगदा खनन कार्य पूर्ण झाल्यानंतर बोगदा खनन यंत्र बाहेर काढण्यासाठी कशेळी (भिवंडी) येथे १२८ मीटर खोलीचा पुनर्प्राप्ती शाफ्ट उभारण्यात येत आहे. त्यातील शाफ्टचे उत्खनन कार्य १५ मीटर खोलीपर्यंत पूर्ण झाले आहे. प्रकल्प अंतर्गत बोगदा खनन संयंत्राच्या सहाय्याने बोगदा खोदकामास जुलै २०२६ पासून सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली.