मुंबई : दक्षिण मुंबईमधील हुतात्मा चौकातील मोफत वाहनतळावर वाहने उभी करण्यासाठी अनधिकृतपणे शुल्क वसुली सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला. महापालिकेच्या गस्ती पथकाने हा गंभीर प्रकार उघडकीस आणला. या प्रकरणी महापालिका प्रशासनाने माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे शुल्क वसुली करणारे दोन्ही आरोपी पदपथावर वास्तव्यास असून ते मूळचे मध्य प्रदेशमधील रहिवासी आहेत.

दक्षिण मुंबईतील रस्त्यावरील वाहनतळांवर अनेकदा निश्चित केलेल्या दरांपेक्षा जास्त शुल्क वसुली होत असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुंबई महापालिकेने काही वाहनतळे तात्पुरत्या स्वरुपात मोफत केली आहेत. दक्षिण मुंबईतील डी. एन. रोड, हुतात्मा चौक येथे मुंबई महापालिकेने मोफत वाहनतळाची सुविधा उपलब्ध केली आहे.

या ठिकाणी गाडी उभी करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. मात्र या मोफत वाहनतळांवरही अनधिकृतपणे गाडी उभी करण्याचे पैसे उकळण्यात येत असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे महापालिकेने येथे गस्त घालण्यासाठी कर्मचारी नेमले. हुतात्मा चौक येथे अनधिकृतपणे पार्किंगचे शुल्क वसूल केले जात असल्याचे या कर्मचाऱ्यांना आढळले.

प्रति तास दीडशे रुपये

महापालिकेचे कर्मचारी मुकादम जितेंद्र वसईकर यांनी या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान, या वाहनतळावर दोन जण खाजगी वाहन चालकांकडून पार्कींगच्या नावाखाली अनाधिकृतरित्या पैसे घेत होते. या दोघांच्या हातात वॅले टॅग नावाचे पार्किंगचे पावती पुस्तकही होते.

पावतीबाबत हटकले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याचवेळी तिथे दोन जण आले व त्यांनी आपल्याकडून गाडी उभी करण्यासाठी शुल्क म्हणून प्रती तास दीडशे रुपये घेतले, असे वसईकर यांनी तक्रारीत म्हटले आहे.

शुल्क वसूल करणारे मूळचे मध्य प्रदेशचे

या प्रकरणी दोघांविरोधात तक्रार करण्यात आली असून ते दोघेही पदपथावर राहतात. ते मूळचे मध्य प्रदेशमधील रहिवासी आहेत. अमित मनोज सोनी ( १८) आणि क्रिश कौशलकिशोर गुप्ता (१८) अशी या दोघांची नावे असून ते फोर्ट परिसरात पंजाब ग्रील हॉटेल समोरील पदपथावर राहतात. हे दोघेही मध्य प्रदेशातील सतना येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी केलेल्या चौकशीत उघड झाले.

विशेष तपासणी पथक

दक्षिण मुंबईतील सशुल्क वाहनतळांवर अनधिकृतपणे पार्किंग शुल्क वसूल करत असल्याच्या घटना अनेकदा उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे २०१८ मध्ये मुंबई महापालिकेने विशेष तपासणी पथकेही स्थापन केली होती. पार्किंगचे शुल्क वसूल करणाऱ्यांकडे ओळखपत्र आहे का ? त्यांनी नेमून दिलेला गणवेश घातला आहे का, तसेच वाहने नेमून दिलेल्या जागेतच उभी केली आहेत का ? तसेच मोफत पार्किंगची व्यवस्था असलेल्या ठिकाणी कोणी अनाधिकृतरित्या पार्किंग शुल्क वसूल करीत आहे का ? हे तपासण्याची जबाबदारी या पथकाकडे सोपविण्यात आली आहे.