मुंबई : केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६’मध्ये मुंबईची कामगिरी उत्तम व्हावी यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना साद घातली आहे. संपूर्ण मुंबई महानगरात स्वच्छता राखून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने केले आहे. तसेच, मुंबई महानगरपालिकेतील घनकचरा, पर्जन्यजल, मलनिस्सारण प्रचालन, मुंबई सांडपाणी विल्हेवाट प्रकल्प, शिक्षण आदी विभागांनी मुंबईत स्वच्छ सर्वेक्षणासाठी उत्तम समन्वयातून प्रभावी उपाययोजना कराव्यात. मूल्यमापन व अहवालासाठी आवश्यक असलेली सर्वसमावेशक, अचूक व अद्ययावत माहिती संकलित करावी, असे निर्देशही जोशी यांनी दिले.

स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने, मुंबई महानगरपालिका मुख्यालयात २ फेब्रुवारी रोजी बैठक पार पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या. उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्यासह विविध विभागांतील अधिकारी यावेळी उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि नागरी कार्य मंत्रालयातर्फे शहरांमधील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि नागरिक सहभागाचे मूल्यांकन करून क्रमवारी निश्चित करण्याच्या उद्देशाने दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षणाचे आयोजन करण्यात येते. यंदा स्वच्छ सर्वेक्षणाचे दहावे वर्ष आहे. या अंतर्गत उत्तम स्वच्छता, कचरा वर्गीकरण, संकलन आणि वाहतूक, प्रक्रिया आदी बाबींवर मूल्यमापन करण्यात येते.

नवे निकष

केंद्र शासनाकडून ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६’साठी ‘स्वच्छता की नई पहल – बढाए हाथ, करे सफाई साथ’ ही मध्यवर्ती संकल्पना मांडण्यात आली आहे. या अंतर्गत, स्वच्छतेसंदर्भात नागरिकांचा अभिप्राय आणि पडताळणीला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. यानुसार, संकेतस्थळ आणि ॲप्सच्या माध्यमातून वर्षभर डिजिटल अभिप्राय संकलित करण्यात येणार आहे. उघड्यावर शौच व लघवी करण्यावर प्रतिबंधाच्या अनुषंगाने नवीन मानके निश्चित करण्यात आली आहेत. तसेच, शाळांमधील वर्तन बदल कार्यक्रमांवर (Behaviour Change Programs) भर देण्यात येत आहे. यंदाच्या सर्वेक्षणात किनारपट्टीवरील शहरांसाठी स्वतंत्र मूल्यांकन निकष लावण्यात आले

आहेत. पर्यटन / वारसा / धार्मिक स्थळे आणि जास्त वर्दळीची सार्वजनिक ठिकाणे यांच्याशी संबंधित स्वच्छतेच्या निकषांवरही विशेष भर देण्यात आला आहे.

नागरिक आणि विद्यार्थ्यांना सहभागी करावे

मुंबईमध्ये (शहर आणि उपनगरे) घनकचऱ्याचे प्रभावी आणि शास्त्रोक्त पद्धतीने योग्य व्यवस्थापन करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून अविरतपणे प्रयत्न केले जात आहेत. स्वच्छ सर्वेक्षणात या प्रयत्नांचे योग्य मूल्यमापन दिसण्यासाठी प्रभावीपणे उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी, घनकचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण प्रचालन व प्रकल्प, मुंबई सांडपाणी विल्हेवाट प्रकल्प, पर्जन्य जलवाहिनी तसेच शिक्षण विभाग आदी विभागांनी समन्वयातून प्रभावी उपाययोजना कराव्यात. मूल्यमापन व अहवालासाठी आवश्यक असलेली सर्वसमावेशक, अचूक व अद्ययावत माहिती संकलित करावी. तसेच, यंदा सर्वेक्षणात नागरिक सहभाग व शाळा-आधारित उपक्रमांवर विशेष भर देऊन नागरिक व विद्यार्थ्यांचा या प्रक्रियेत सहभाग निश्चित करावा. विद्यार्थ्यांमध्ये बालवयातच स्वच्छतेच्या सवयी रुजल्या तर सामाजिक स्तरावर दीर्घकालीन व शाश्वत वर्तनबदल घडतो. यामुळे, नागरी स्वच्छतेला हातभार लागतो. नागरिकांनीही स्वच्छतेला प्राधान्य देत महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. अश्विनी जोशी यांनी यावेळी केले.

नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे

स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आणि स्वच्छता उपक्रमांत त्यांचा सहभाग फार महत्वाचा आहे. आपले घर, परिसर, सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ राहावीत, यासाठी नागरिकांनी प्रयत्न करावेत. निवासी संकुलांमध्येच कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावावी. प्रशासनाकडून स्वच्छतेसंदर्भात राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे. तसेच, कचरा करणाऱ्यांना परावृत्त करावे, असे आवाहनही डॉ. जोशी यांनी केले.