१८ ते २० तारखेला ज्येष्ठांना विनानोंदणी सुविधा

मुंबई: चक्रीवादळाच्या इशाऱ्यामुळे मुंबईत सोमवारीही लसीकरण बंद राहणार आहे. तसेच १८ ते २० मे या कालावधीत  ६० वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी नोंदणी न करताच लशीची पहिली मात्रा घेण्याची सुविधा उपलब्ध असेल, असे  पालिकेने जाहीर केले आहे.

दुसऱ्या मात्रेचे अनेक लाभार्थी लशीच्या प्रतिक्षेत असल्यामुळे पालिकेने पूर्वनोंदणी बंधनकारक करण्यासह दुसरी मात्रा घेण्यास पात्र असलेल्या नागरिकांना प्राधान्याने लस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. केंद्रीय आरोग्य विभागाने कोविशिल्डच्या दुसऱ्या मात्रेचा कालावधी १२ ते १६ आठवडे केल्यामुळे आता आरोग्य आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीच दुसऱ्या मात्रेसाठी पात्र आहेत. त्यामुळे लशीचा साठा काही प्रमाणात उपलब्ध होत असल्यामुळे ६० वर्षांवरील सर्व नागरिकांचे नोंदणी न करता केंद्रांवर १८ ते २० मे या कालावधीत थेट लसीकरण केले जाणार आहे. चक्रीवादळामुळे सोमवारी होणारे लसीकरण रद्द केले आहे. मंगळवारपासून मात्र नियमित लसीकरण सुरू करण्यात येईल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

पुन्हा गर्दीची शक्यता

लस उपलब्ध होण्यात अनियमितता आणि नोंदणीतील अडथळे यामुळे ४५ वर्षांवरील नागरिकांना गेल्या काही दिवसांत लशीची पहिली मात्रा घेता आलेली नाही. आता  मर्यादित काळाकरिता नोंदणी न करता थेट लसीकरण खुले केल्यामुळे पुन्हा लसीकरण केंद्रावर गर्दी होण्याची शक्यता आहे.