मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेपैकी जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टरमध्ये बिघाड झाल्याने फिल्टर न करता पाणीपुरवठा होत असल्याचा संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित झाला असून हा संदेश खोटा आणि दिशाभूल करणारा आहे, असे मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याने स्पष्ट केले आहे. मुंबईकरांनी या अफवेवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
मुंबई महानगरपालिकेकडून मुंबईकरांना दररोज ४१०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. पाणीपुरवठा करताना, जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि आयएस १०५००-२०१२ ने प्रमाणित केलेल्या मानकांनुसारच जलशुद्धीकरण प्रक्रिया केली जाते. एकूणच, मुंबईकरांना शुद्ध, निर्जंतुकीकरण आणि स्वच्छ पाण्याचा पुरवठा केला जातो, असे मुंबई महानगरपालिकेच्या जल विभागाने स्पष्ट केले आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेत पांजरापूर (प्रतिदिन १४४० दशलक्ष लिटर), भांडुप संकुल (प्रतिदिन २८१० दशलक्ष लिटर), विहार (प्रतिदिन १०० दशलक्ष लिटर) आणि तुळशी (प्रतिदिन १८ दशलक्ष लिटर) येथे पाणी शुद्धीकरणासाठी आणले जाते. या पाण्यावर पॉली एल्युमिनियम क्लोराईड (पीएसी), रॅपिड सँड फिल्टर्स, निर्जंतुकीकरणासाठी क्लोरीनचा वापर आदी प्रक्रिया केली जाते. त्यानंतर, शुद्ध पाणी मुंबईकरांना पुरवले जाते.
एकूणच मुंबईकरांना शुद्ध, निर्जंतुकीकरण केलेले आणि पूर्णपणे स्वच्छ पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यामुळे समाज माध्यमांवरील खोट्या, दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध राहावे, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
