bmc collects only 54 percent of property tax in current financial year mumbai print news zws 70 | Loksatta

मुंबई : मालमत्ता कराची केवळ ५४ टक्के वसुली

गेल्या आर्थिक वर्षात महानगरपालिकेने मालमत्ता कर वसुलीतून सात हजार कोटी रुपयांचे उत्पन्न अंदाजित केले होते.

bmc-675
(संग्रहित छायचित्र)/ लोकसत्ता

आर्थिक वर्ष संपण्यासाठी केवळ दोन महिने उरलेले असताना मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेल्या मालमत्ता कराची आतापर्यंत केवळ ५४ टक्के वसुली करण्यात करनिर्धारण आणि संकलन विभागाला यश आले आहे. ३१ जानेवारीपर्यंत सुमारे ३९०० कोटी रुपये मालमत्ता कर वसूल झाला आहे. यंदा मालमत्ता करापोटी सात हजार कोटी रुपये महसूल गोळा करण्याचे उद्दीष्ट्य महानगरपालिकेने ठेवले होते. गेल्यावर्षीपेक्षा यंदा मालमत्ता करवसुली वाढलेली असली तरी येत्या दोन महिन्यात महानगरपालिकेला तब्बल तीन हजार कोटी रुपयांची वसुली करावी लागणार आहे.

हेही वाचा >>> राज्यातील सर्व शाळांमध्ये साजरा होणार आजी आजोबा दिवस; शासनाकडून परिपत्रक जारी

मालमत्ता कर हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्त्रोत आहे. दरवर्षी महानगरपालिकेला साधारण पाच ते सहा हजार कोटी रुपये उत्पन्न मालमत्ता कराच्या वसुलीतून मिळते. विशेष म्हणजे १ जानेवारी २०२२ पासून मुंबईत ५०० चौरस फुटापर्यंतच्या निवासी सदनिकांना संपूर्ण मालमत्ता करातून सूट देण्यात आली आहे. एकूण १६ लाख १४ हजार निवासी सदनिकाधारकांना त्याचा लाभ झाला आहे. ही सवलत लागू केल्यानंतरचे हे पहिले वर्ष असून यंदा किती मालमत्ता कर जमा होतो याबाबत उत्सुकता आहे.

हेही वाचा >>> मुंबई: म्हाडा दुरुस्ती मंडळात बनावट वितरण! पायधुनी पोलिसांकडून चौकशी सुरू

गेल्या आर्थिक वर्षात महानगरपालिकेने मालमत्ता कर वसुलीतून सात हजार कोटी रुपयांचे उत्पन्न अंदाजित केले होते. मात्र दर पाच वर्षांनी होणारी करफेररचना गेल्यावर्षी होऊ न शकल्यामुळे महानगरपालिकेने मालमत्ता कर वसुलीचे उद्दीष्ट्य सुधारित करून ४८०० कोटी रुपयांवर आणले होते. यावर्षीही महानगरपालिकेने सात हजार कोटी रुपये मालमत्ता कर वसुलीचे उद्दीष्ट्य ठेवले आहे. मात्र ३१ जानेवारीपर्यंत ३८५९ कोटी रुपये करवसूली झाली आहे. आर्थिक वर्ष मार्चमध्ये संपत असल्यामुळे अनेक मालमत्ताधारक ३१ मार्चपर्यंत मालमत्ता कर भरत असतात. त्यामुळे येत्या दोन महिन्यात कर वसुली किती होते याबाबत उत्सुकता आहे.

मालमत्ता कर भरण्याची यंत्रणा दहा दिवस बंद

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मालमत्ता कराची संगणकीय प्रणाली अद्ययावत करण्याची कार्यवाही सुरु आहे. या कामाचा एक भाग म्हणून ३ ते १० फेब्रुवारीदरम्यान मालमत्ता करप्रणाली कामकाजासाठी बंद राहणार आहे. त्यामुळे करदात्यांना या कालावधीत आपल्या मालमत्ता करांचा भरणा करावयाचा असल्यास त्यांनी आपल्या संबंधित विभाग कार्यालयातील करनिर्धारण व संकलन खात्याचे अधिकारी / कर्मचारी यांच्याकडे भरणा रकमेचे धनादेश / डिमांड ड्राफ्ट सुपूर्द करुन त्याची पोचपावती घ्यावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 19:33 IST
Next Story
राज्यातील सर्व शाळांमध्ये साजरा होणार आजी आजोबा दिवस; शासनाकडून परिपत्रक जारी