मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या मुदत ठेवीबाबत खूप चर्चा होते, मुदत ठेवी कमी होत असल्याबाबत चिंता व्यक्त केली जाते. मात्र मुदत ठेवीबाबत सध्या चिंता करण्याचे काही कारण नाही, अशी ग्वाही मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली.पालिकेने मोठ्या प्रकल्पांसाठी पुढील दोन आर्थिक वर्षांचे नियोजन केले आहे. मात्र या दोन वर्षात पुढील आर्थिक नियोजन केले नाही, तर भविष्यात निधीची चणचण भासू शकते, असा इशाराही पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राच्या ‘आयडिया एस्चेंज’ कार्यक्रमात मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिकेशी संबंधित विविध विषयांवर आपली मते व्यक्त केली.

बँकांचे व्याजदर पाहता या मुदत ठेवीतून फारसा लाभ मिळत नाही. त्यापेक्षा हा निधी लोकोपयोगी प्रकल्पांसाठी वापरणे चांगले आहे. प्रकल्पांसाठी निधी वापराबाबत पुढील दोन आर्थिक वर्षांचे नियोजन केले आहे. मात्र तोपर्यंत उत्पन्नाचे नवनवीन स्रोत निर्माण झाले नाही तर मात्र भविष्यात निधीची चणचण भासू शकते, असे मत गगराणी यांनी व्यक्त केले. गेल्या काही वर्षात पालिकेच्या उत्पन्नाच्या स्रोतात वाढ झालेली नाही. तसेच मालमत्ता करातही वाढ झालेली नाही. त्यामुळे नियोजन करावे लागेल, असे मत आयुक्तांनी व्यक्त केले.

५० टक्के पाण्याचा पुनर्वापर करणार

एका पवई तलावाच्या क्षमतेएवढे सांडपाणी समुद्रात सोडले जाते. सध्या अगदीच प्राथमिक प्रक्रिया करून सांडपाणी समुद्रात सोडले जात आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी मुंबई महापालिकेने सात ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्रे अद्यायावत करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यामुळे हे सात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प २०२८ पर्यंत पूर्ण होतील. त्यामुळे सांडपाण्यावर द्वितीय स्तरावरील प्रक्रिया करून ते पाणी समुद्रात सोडले जाईल. त्यापैकी ५० टक्के पाण्याचा पुनर्वापर करण्यात येणार आहे. समुद्रात सोडल्या जाणाऱ्या पाण्याचा दर्जा सुधारल्यामुळे येत्या काही वर्षांत मुंबईलगतच्या समुद्राचा रंग बदलेला दिसेल, असेही आयुक्तांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc commissioner bhushan gagrani express view about fd of mumbai municipal corporation mumbai print news zws