मुंबई : मुंबईत ठिकठिकाणी मेट्रोची कामे सुरू असून या कामांसाठी स्तंभ उभारताना मलनि:स्सारण वाहिन्या फुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. परिणामी, मलनि:स्सारण वाहिन्यांमधून सतत गळती होत असल्यामुळे रस्ता खचण्याच्या घटना घडू लागल्या आहेत.

त्यामुळे यापुढे ज्या क्षेत्रांमध्ये एमएमआरडीएने कामे केली आहेत, त्या ठिकाणी अशा प्रकारच्या रस्त्यातील पोकळी निर्माण झाल्यास, त्याची दुरुस्ती एमएमआरडीएनेच करावी, अशा आशयाचे खरमरीत पत्र मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी एमएमआरडीए प्रशासनाला पाठवले आहे.

अंधेरी पश्चिम मेट्रो स्थानक परिसरात ३० ऑक्टोबर रोजी अचानक रस्ता खचला. या घटनेची मुंबई महापालिकेने सविस्तर तपासणी केली असता अंधेरी (पश्चिम) – दहिसर (पश्चिम) मार्गावरील लिंक रोडलगत ‘मेट्रो २ अ’च्या बांधकामाच्या वेळी सांडपाणी वाहिनीच्या अगदी शेजारी मेट्रोचे स्तंभ उभारण्यात आल्याचे आढळून आले.

मेट्रोचे स्तंभ उभारताना निर्माण झालेल्या तीव्र कंपनांमुळे जुन्या सांडपाणी वाहिन्या कोसळल्या व मॅनहोलची हानी झाली. त्यामुळे सांडपाण्याची गळती सुरू राहिली. सततच्या गळतीमुळे माती भुसभुशीत होऊन रस्ता खचण्याची घटना घडल्याचे आढळून आले. यापूर्वीही अनेकदा मलनि:स्सारण वाहिन्यांमधून गळती होत असल्यामुळे रस्ता खचण्याच्या घटना घडल्या आहेत.

तसेच मेट्रोच्या कामांमुळे मलनि:स्सारण वाहिन्यांना धक्का लागत असल्याचे आढळून आले आहे. रस्ता खचला की त्याची दुरुस्ती मुंबई महापालिका प्रशासनाला करावी लागते. तसेच नागरिकांकडून महापालिकेवर टीकाही होते. त्यामुळे भूषण गगराणी यांनी एमएमआरडीए प्रशासनाला याबाबत पत्र पाठवून सूचना केल्या आहेत.

मुंबईत अनेक ठिकाणी मेट्रोची कामे सुरू असून पालिकेच्या संबंधित विभागाची मान्यता, नोंद न करता ही कामे करण्यात येत आहेत. एमएमआरडीएने अनेक ठिकाणी पालिकेच्या अनेक उपयोगिता वाहिन्या वळवल्या आहेत व त्यात त्रुटी आहेत. अनेक ठिकाणी मेट्रोचे स्तंभ आणि विद्यमान सांडपाणी वाहिन्या एकमेकांना छेदत आहेत.

त्यामुळे भविष्यात खोल सांडपाणी वाहिन्यांचे नुकसान होऊन मोठ्या प्रमाणात रस्ता खचण्याची शक्यता आहे, अशी भीती गगराणी यांनी पत्रात व्यक्त केली आहे. एमएमआरडीएने काम केलेल्या ठिकाणी अशा प्रकारे रस्त्याखाली पोकळी निर्माण झाल्यास, त्याची दुरुस्ती एमएमआरडीएनेच करावी, असेही या पत्रात म्हटले आहे.

यापूर्वीच्या घटना

  • १) कांदिवली पश्चिम येथे १८ ऑगस्टला मेट्रो स्टेशनजवळ रस्ता खचला.
  • २) ‘मेट्रो ३’च्या कामादरम्यान ॲनी बेझंट रोड, वरळी येथे सांडपाणी वाहिनीचे नुकसान झाले. ही वाहिनी वळवण्याचे काम अद्याप प्रलंबित आहे.
  • ३) ‘मेट्रो -२ ब’च्या कामादरम्यान विलेपार्ले (पश्चिम) येथील एस. व्ही. रोडलगत सांडपाणी वाहिनी फुटली. वाहिनी वळवण्याच्या कामात त्रुटी असून वारंवार पाठपुरावा व बैठका झाल्यानंतरही समस्या अद्याप कायम आहे.
  • ४) ‘मेट्रो – ६’च्या बांधकामादरम्यान जे.व्ही.एल.आर., जोगेश्वरी (पूर्व) येथे सांडपाणी वाहिनी फुटली असून तिच्या दुरुस्तीचे काम प्रलंबित आहे.
  • ५) ‘मेट्रो-७ अ’च्या बांधकामादरम्यान अंधेरी पूर्व (के/पूर्व विभाग) येथील सेवा रस्त्यालगत सांडपाणी वाहिनी फुटली असून तिथेही दुरुस्ती झालेली नाही.
  • ६) सांताक्रूझ सीएसटी रोड, हंसभुग्रा मार्ग या परिसरातही पुलाच्या बांधकामादरम्यान सांडपाणी वाहिनी फुटली होती. वाहिन्या वळवण्याचे काम झाले असून त्यात त्रुटी असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.