करोनाच्या महासाथीमुळे रखडलेला मुंबईतील सागरी किनारा रस्ता प्रकल्पाने (कोस्टल रोड) पुन्हा वेग घेतला आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल या प्रकल्पाच्या आतापर्यंतच्या कामाबद्दल माहिती दिली. प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी वांद्रे सागरी किनारा मार्गासाठी तब्बल १२ हजार ७२१ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. गेल्या काही महिन्यांपासून या मार्गिकेच्या कामानं वेग पकडला असून नोव्हेंबर २०२० पर्यंत १ हजार २८१ कोटी रूपयांची कामं पूर्ण झाली असल्याचं चहल यांनी सांगितलं.

मरीन ड्राईव्ह ते वांद्रे वरळी सी-लिंकपर्यंतच्या प्रस्तावित रस्त्याची लांबी १०.५८ किलोमीटर आहे. त्यात दोन्ही दिशांना चार-चार मार्गिका, उन्नत मार्ग, बोगद्यांची जोड दिली जाणार आहे. आतापर्यंत अरबी समुद्रातील १७५ एकर जागेचं अधिग्रहण करण्यात आलं असून १०२ एकर जमीनीच्या अधिग्रहणाच्या प्रक्रिया सुरू असल्याचं चहल म्हणाले. ४०० मीटर लांबीची टनल बोरिंग मशीनही त्या ठिकाणी उभारण्यात आली असून बोगद्याचं कामही ७ जानेवारी २०२१ पासून सुरू करण्यात येणार आहे. आतापर्यंत या रस्त्याचं १७ टक्के फिजिकल काम पूर्ण झालं असून जुलै २०२३ पर्यंत हा मार्ग कार्यान्वित होणार असल्याचंही चहल यांनी सांगितलं.