मुंबई : लालबाग येथील मसाला गल्लीत मुंबई महापालिकेने सलग दोन दिवस अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करून रस्त्यावर बसणाऱ्या फेरीवाल्यांना हटवले. रस्त्यावरच लाल मिरच्या, गरम मसाले विकणारे फेरीवाले आणि रस्त्यावर माल ठेवणाऱ्या दुकानदारांवर पालिकेच्या एफ दक्षिण विभागाने कारवाई केली.
लालबागचा परिसर हा रोजच्या जेवणातील मसाल्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी खडे मसाले भाजून, कुटून देणारी अनेक दुकाने रांगेने आहेत. मुंबईच्या विविध भागातून ग्राहक या ठिकाणी तयार मसाले विकत घेण्यासाठी किंवा साठवणीचे मसाले तयार करून घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे या ठिकाणच्या मसाला गल्लीत मोठी गर्दी असते. उन्हाळा आला की साठवणीचे मसाले तयार करणाऱ्यांची गर्दी वाढते. त्यातच दुकानदार
रस्त्यावरच गोण्या अंथरून त्यावर गरम मसाले वाळवत ठेवतात. तसेच अनेक फेरीवालेही मसाल्याचे पदार्थ घेऊन बसतात. त्यामुळे या भागात नागरिकांना ये – जा करण्यासाठी जागाच उरत नसल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची तक्रार वारंवार होत असते. मुंबई महापालिकेच्या एफ दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्त वृषाली इंगळे यांनी शुक्रवारी या मसाला गल्लीत अतिक्रमण निर्मूलनाची मोठी कारवाई हाती घेतली.
यावेळी रस्त्यावर बेकायदा मसाला विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने बेकायदा फेरीवाल्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. दररोज एक रस्ता अतिक्रमण निर्मूलनसाठी निवडण्यात येतो.
त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी लालबाग मसाला गल्लीतील रस्त्यावर बेकायदा मसाला विक्री करणाऱ्यांवर अतिक्रमण निर्मूलन विभागाने कारवाई केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या कारवाईत जप्त करण्यात आलेला माल गोदामात जमा करण्यात आला आहे. या परिसरात गुरुवारीही कारवाई करण्यात आली होती. मात्र शुक्रवारी पुन्हा रस्त्यावर अतिक्रमण केल्यामुळे पुन्हा एकदा कारवाई करण्यात आली. पुढील काही दिवस या गल्लीत कारवाई सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
