मुंबई : प्रशासनाचे आधुनिकीकरण आणि प्रकल्पांना जलद मंजुरी मिळावी, या उद्देशाने मुंबई महापालिका बांधकाम क्षेत्रासाठी प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित सुविधा सुरू करण्यास सज्ज आहे. यामुळे मंजुरी प्रक्रिया स्वयंचलित होऊन आपसूकच मानवी हस्तक्षेप कमी होईल. त्यामुळे एकूणच बांधकामविषयक परवानग्यांमध्ये सहजसुलभता येईल, असा दावा महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी केला.
‘नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कॉन्सिल’ (नेरडको) महाराष्ट्रचे नवे अध्यक्ष म्हणून सृष्टी समुहाचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक कमलेश ठाकूर यांनी पदभार स्वीकारला. त्यावेळी त्या बोलत होत्या. याशिवाय जय गोएंका यांनी सचिव तर मनन शाह यांची खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी महापौर रितू तावडे याही उपस्थित होत्या.
अनेक नागरी मंजुरी प्रणालींना डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये जोडण्यात आल्यामुळे विकासक, वास्तुविशारद आणि सल्लागारांना रिअल-टाइममध्ये अर्ज सादर करणे आणि अर्जाचा पाठपुरावा करणे शक्य होणार आहे. कागदपत्रांची पडताळणी, अनुपालन तपासणी आणि अंदाजित विश्लेषणासाठी एआय साधनांचा वापर करून मंजुरीचा कालावधी वेगाने कमी करणे हे यामागील उद्दीष्ट्य आहे, असे सांगन श्रीमती भिडे म्हणाल्या की, ही प्रणाली मानवी हस्तक्षेप कमी करून आणि प्रक्रियांचे मानकीकरण करून अधिक पारदर्शकता आणि जबाबदारी आणेल. यामुळे त्रुटी निदर्शनास येण्याबरोबरच विकास नियंत्रण नियमांचे पालन सुनिश्चित करेल. बांधकाम क्षेत्र हा आर्थिक वाढ आणि शहरी विकासाचा एक महत्त्वाचा घटक असल्याने एआय आधारित सुविधेमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढण्याची आणि प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती मिळण्याची अपेक्षा आहे, अशी अपेक्षाही भिडे यांनी व्यक्त केली.
बांधकाम क्षेत्रासाठी मुंबई हे व्यवसाय सुलभतेत ‘मॉडेल’ शहर बनत आहे. बांधकाम प्रस्तावांची मंजुरी ४५ दिवसांच्या आत दिली जात आहे. यामुळे केवळ विकासाला गती मिळत नाही, तर भागधारकांमध्ये विश्वासही निर्माण होतो. आम्ही महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणाऱ्या सर्वसमावेशक शहरी वाढीसाठी वचनबद्ध आहोत. विकासकांना महिलांसाठी स्वच्छतागृहे यांसारख्या आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यात सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करत आहोत, असे आवाहन महापौर रितू तावडे यांनी केले.
यावेळी नरेडको महाराष्ट्रने तयार केलेल्या ‘नरेडको वन’ या डिजिटल ॲपचे उद््घाटन करण्यात आले. या अॅपमुळे नरेडको महाराष्ट्रच्या सर्व विकासक सदस्यांना विविध प्रकारच्या माहितीचे देवाण-घेवाण करणे शक्य होणार आहे. मावळते अध्यक्ष प्रशांत शर्मा यांनी वर्षभराच्या कालावधीत केलेल्या कार्याचा आढावा घेतला.
