|| संदीप आचार्य

मुंबई : करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर करोना रुग्णवाढ होऊ नये यासाठी आगामी काळात येणारे सण साजरे करताना मुंबईकरांनी करोनाच्या नियमांचे जास्तीत जास्त पालन करावे यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. आगामी पंधरा दिवस हे या दृष्टीने  महत्त्वाचे असून याच काळात करोनाच्या तिसऱ्या लाटेचे भवितव्य निश्चित होईल, असे अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

 पावसाळा संपत असल्याने मुंबईतील बांधकाम व्यवसाय व अन्य कामांसाठी येणारा मजूरवर्ग तसेच गणेशोत्सव काळात कोकणात गावी गेलेला वर्ग परतल्यानंतरचे पंधरा दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याचे सुरेश काकाणी यांनी सांगितले. त्या दृष्टीने चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली असून चाचण्या व आवश्यक तपासणी करण्यासाठीची ठिकाणेही निश्चित करण्यात आली आहेत. गेल्या काही दिवसांत मुंबईत जी करोना रुग्णवाढ झाली आहे ती प्रामुख्याने गृहनिर्माण संस्थांमध्ये झाली असून मुंबईतील झोपडपट्टीत ही वाढ झाली नसल्याचे काकाणी म्हणाले. आगामी पंधरा दिवसांत जर करोना रुग्णांची वाढ झाली नाही तर तिसरी लाट आटोक्यात आली असे मानता येऊ शकते.

पालिकेकडून तयारी

तिसरी लाट आल्यास त्याचा सामना करण्याची  सज्जता करण्यात आल्याचे काकाणी यांनी सांगितले. जवळपास तीस हजार खाटांची तयारी ठेवली असून प्राणवायूची कमतरता भासणार नाही याचे नियोजन करताना लहान मुलांसाठी सर्व प्रकारचे व्यवस्थापन करण्यात आले आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत २१ हजार खाटांची व्यवस्था केली होती. त्यावेळचा रुग्णवाढीचा दर लक्षात घेऊन या वेळी संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे.

 तिसरी लाट रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने सर्व शक्ती पणाला लावली असून लोकांनीही आवश्यक ती काळजी घेतली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.