मुंबई : मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि अधिकारी, कर्मचारी, कामगारांमधील दुवा ठरणाऱ्या कर्मचारी संघटनांना उतरती कळा लागली असून भविष्यात महानगरपालिकेतील अस्तित्व टिकविण्यासाठी संघटनांना धडपड करावी लागत आहे.
एकेकाळी महापालिकेतील कामगार नेते शरद राव यांच्या नेतृत्वाखालील म्युनिसिपल मजदूर युनियन, शिवसेनाप्रणित म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना बलाढ्य कामगार संघटना मानल्या जात होत्या. मात्र गेल्या आठ-नऊ वर्षांमध्ये या संघटनांच्या सदस्य संख्येत कमालीची घट झाली असून सदस्य संख्या जपण्याचे, वाढविण्याचे मोठे आव्हान संघटनांसमोर आहे. त्याचबरोबर सदस्य वर्गणीत झालेली घट आणि संघटनेतील पूर्णवेळ पदाधिकाऱ्यांचा खर्च जुळविताना संघटनांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
काही वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये तब्बल सव्वा लाखांहून अधिक अधिकारी, कर्मचारी, कामगार कार्यरत होते. कालौघात मोठ्या संख्येने अधिकारी, कर्मचारी, कामगार सेवा निवृत्त झाले, तर अनेकांचे निधन झाले. महानगरपालिकेच्या सेवेत २०२५ मध्ये ९८ हजार १५४ जण कार्यरत होते.
काही जण निवृत्त, तर काही जणांचे निधन झाल्याने २०२६ मध्ये महापालिकेतील कर्मचारी संख्या ८७ हजार २०४ वर आली. साधारण १२-१३ वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेत म्युनिसिपल मजदूर युनियन, शिवसेनाप्रणित म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना प्राबल्य होते. ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांच्या नेतृत्वाखालील म्युनिसिपल मजदूर युनियनने प्रशासनाबरोबर वाटाघाटी करून अनेक कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला.
शरद राव यांच्या निधनानंतर साधारण २०१७ च्या सुमारास म्युनिसिपल मजदूर युनियनमध्ये फूट पडली आणि अखेर दोन शकले झाली. शरद राव यांचे पुत्र शशांक राव आणि राव समर्थक मोठ्या संख्येने म्युनिसिपल मजदूर युनियनमधून बाहेर पडले आणि त्यांनी दि म्युनिसिपल युनियनची स्थापना केली. शिवसेनाप्रणित म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेतही मातब्बर मंडळी कार्यरत होती.
शिवसेनेशी संबंधित अनेक कर्मचाऱ्यांना या संघटनेचा आधार होता. परंतु शिवसेनेची शकले झाली आणि म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेतही पडझड झाली. कणखर नेतृत्वाअभावी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना निष्प्रभ होऊ लागली. त्यामुळे कोणत्या संघटनेचे सदस्यत्व स्वीकारायचे याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला.
दरवर्षी प्रशासनाकडून कर्मचारी संघटनांच्या सदस्य संख्येचा आढावा घेण्यात येतो. त्यावेळी कर्मचाऱ्यांना संघटना बदलण्याची संधी मिळते. अनेक कर्मचाऱ्यांनी कोणत्याही संघटनेचे सदस्य न होण्याचा निर्णय घेतला आहे. अशा कर्मचाऱ्यांची संख्या २०२६ मध्ये २३ हजार ५९० इतकी आहे.
प्रशासनाने घेतलेल्या आढाव्यामध्ये शरद राव यांच्या म्युनिसिपल मजदूर युनियनची सदस्य संख्या २०२५ च्या तुलनेत २०२६ मध्ये १८४७ ने कमी झाली आहे. या संघटनेला २०१७ पासून उतरती कळा लागली आहे. त्यावेळी संघटनेची सदस्य संख्या साधारण ४६ हजाराच्या घरात होती. ती आता २२ हजार ०८९ वर आली आहे. साधारण निम्म्या सदस्यांनी या संघटनेशी काडीमोड घेतला आहे. म्युनिसिपर कर्मचारी कामगार सेनेची सदस्य संख्या २०२५ मध्ये ६,०८९ होती, २०२६ त्यात ५२१ ने घट होऊन ती ५ हजार ५६८ वर स्थिरावली आहे.
मुंबई म्युनिसिपल कामगार संघाच्या सदस्य संख्येत ४६८ ने घट झाली असून या संघटनेची आजची सदस्य संख्या ५ हजार ८२८ इतकी झाली आहे. मात्र त्याच वेळी शरद राव समर्थकांच्या दि म्यनिसिपल युनियनच्या सदस्य संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या संघटनेची सदस्य संख्या २०२५ मध्ये १० हजार ४७४ इतकी होती. २०२६ मध्ये ८८३ कर्मचाऱ्यांनी या संघटनेचे नेतृत्व स्वीकारले. त्यामुळे दि म्यनिसिपल युनियनची सदस्य संख्या ११ हजार ३५७ वर पोहोचली आहे.
कर्मचारी संघटनांचा डोलारा सावरण्यासाठी, तसेच प्रत्येक सदस्याशी संपर्क साधता यावा यादृष्टीने अंतर्गत रचना करण्यात आली आहे. काही संघटनांमध्ये पूर्णवेळ काम करणारे पदाधिकारी असून त्यांना संघटनेकडून मानधनापोटी मोठी रक्कम देण्यात येते. आता सदस्य संख्या कमी झाल्यामुळे मिळणाऱ्या सदस्य शुल्कावर परिणाम झाला आहे. परिणामी, खर्चाचा ताळमेळ बसविण्याचे मोठे आव्हानही कर्मचारी संघटनांसमोर आहे.
मुंबई महानगरपालिकेत १९८२ साली तब्बल एक लाख ५७ हजार कर्मचारी कार्यरत होते. कालौघात कर्मचारी सेवा निवृत्त झाले. आजघडीला ८७ हजार कर्मचारी महापालिकेत कार्यरत आहेत. तब्बल ७७ हजार पदे रिक्त आहेत. तसेच कोणत्याही संघटनेचे सदस्य नसलेल्यांची संख्या २३ हजाराच्या घरात आहे. त्याच परिणाम सदस्य संख्येवर झाला आहे. – अशोक जाधव, अध्यक्ष, म्युनिसिपल मजदूर युनियन.
कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न आणि धोरणात्मक बाबी सोडविण्यासाठी वेळ प्रसंगी प्रशासनातील विविध स्तरावर, तसेच न्यायालयांमध्ये कर्मचाऱ्यांची बाजू अतिशय भक्कमपणे मांडून त्यांना न्याय मिळवून देत असल्याने दरवर्षी अन्य संघटनांची सदस्य संख्या कमी होत असतानाच दि म्युनिसिपल युनियनची सदस्य संख्या वाढत आहे. – रमाकांत बने, सरचिटणीस, दि म्युनिसिपल युनियन.
