मुंबई : मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या गोरेगाव – मुलुंड जोड रस्ता प्रकल्पांतर्गत बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून साडेपाच किमी लांबीचा जोडबोगदा तयार करण्यात येणार आहे. या बोगद्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याकरीता राज्य मुख्य वन्यजीव संरक्षक यांनी घातलेल्या अटी शर्तींनुसार संजय गांधी उद्यानाच्या प्रशासनाला प्रकल्पाच्या एक टक्का रक्कम द्यावी लागणार आहे.
मुंबई महापालिका संजय गांधी उद्यानाला तब्बल २० कोटी रुपये देणार आहे. परंतु, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बाकी कोणत्याही प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या गाड्यांना प्रवेश असतो, पण केवळ मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांच्या गाड्यांनाच बंदी का असा सवाल या बाबतच्या प्रस्तावावर बोलताना नगरसेवकांनी उपस्थित केला आहे.
मुंबई महापालिकेच्या गोरेगाव – मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाचे काम हाती घेतले असून या या मार्गावर फिल्मसिटी गोरेगाव ते अमरनगर मुलुंडदरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून ५.३० किमी लांबीचे जोड बोगदे तयार करण्यात येणार आहे. तर चित्रनगरी परिसरामध्ये १.३२ किमी लांबीचा पेटी बोगदा व त्यांचे पोहोच रस्ते यांचा समावेश आहे. गोरेगाव मुलुंड जोडरस्ता प्रकल्पाचे काम २०२३ मध्ये सुरू झाले असून ऑक्टोबर २०२८ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे.
बोगद्याच्या प्रस्तावाला मंजुरी देताना राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने काही अटी शर्तीनुसार मंजुरी दिली आहे. त्यात प्रकल्पाच्या एक टक्का रक्कम संजय गांधी उद्यानाला द्यावी लागणार आहे. प्रकल्पाचा २०१७ मधील खर्च १९९७ होता. त्याच्या एक टक्का रक्कम म्हणजे सुमारे २० कोटी रुपये मुंबई महापालिकेला संजय गांधी उद्यानाला द्यावे लागणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर आला असता नगरसेवकांनी प्रश्नांची सरबत्ती केली.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नगरसेवकांच्या गाड्यांना प्रवेश बंदी का असते, हे उद्यान मुंबईच्या हद्दीत आहे का असा सवाल शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या दीपमाला बढे यांनी केला. तर काही दिवसांपूर्वी उद्यान प्रशासनाने उद्यानातील बेस्टची बस फेरी बंद केली व स्वत:ची विद्युत बस सुरू केली. बेस्टची विद्युत बस होती, मग ती का बंद केली असा सवाल सभागृहनेते गणेश खणकर यांनी केला.
प्रकल्पाचा खर्च वाढला
दरम्यान, बोगद्याचा खर्च गेल्या सहा वर्षात १९९७ वरुन ६२७१ कोटीवर गेला आहे. मग पुन्हा एक टक्क्याप्रमाणे संजय गांधी उद्यानाला द्याव्या लागणाऱ्या रकमेत वाढ होणार का असा सवाल काँग्रेसचे गटनेते अश्रफ आजमी यांनी केला.
निधी कुठे वापरणार
राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या मंजुरीतील अटीनुसार राज्य मुख्य वन्यजीव संरक्षक संरक्षित क्षेत्रासाठी मानव वन्यजीव संघर्ष वन्यजीव संवर्धनाची योजना तयार करतील व वापरकर्ता संस्थेने जमा केलेली रक्कम या योजनेच्या अंमलबजावणीसाठी वापरली जाईल असे ठरले आहे. त्यानुसार उद्यानातील आणि तुंगारेश्वर अभयारण्यातील मानव वन्यजीव संघर्ष निवारण योजना आणि वन्यजीव संवर्धन योजनेच्या अंमलबजावणीसाठी एक टक्का रक्कम संजय गांधी उद्यानात अदा करण्याबाबत पालिका प्रशासनाला कळवले आहे. मात्र हा निधी नक्की कुठे व कसा वापरणार, असा सवाल गणेश खणकर यांनी केला.
