आरोग्य, पाणी, शिक्षण समस्यांऐवजी रस्त्यांच्या नामकरणाच्या प्रश्नांवर भर
निवडणुका जवळ येताच नागरी समस्यांविषयी तावातावाने भांडणाऱ्या मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना गेल्या साडेचार वर्षांत मात्र या समस्यांची तमा नसल्याचे दाखवणारी आकडेवारी आता उजेडात आली आहे. शिक्षण आणि आरोग्य अशा प्राथमिक सुविधांबाबत सर्वपक्षीय नगरसेवकांनी गेल्या चार वर्षांत तीनशे-चारशे प्रश्न विचारल्याचे एका अहवालातून उघड झाले आहे. याउलट याच नगरसेवकांनी मुंबईतील विविध रस्त्यांच्या नामकरणांसंदर्भात मात्र तब्बल १३२० प्रश्न विचारले. रस्त्यांचे नावे बदलणे, कार्यालयीन कामकाज, इमारती, परवाने अशा नागरिकांशी संबंध नसलेल्या प्रश्नांवरच या नगरसेवकांचा भर असल्याचे गेल्या चार वर्षांतील प्रश्नांच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे.
रस्ते, रस्त्यांचे नामकरण, इमारती, कार्यालयीन कामकाज आणि परवाने हे विषय नगरसेवकांच्या प्राधान्यक्रमात पहिल्या पाच क्रमांकांमध्ये आहेत. रस्त्यांची, चौक, स्मारके, इमारती आणि रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यासाठी २०१२ ते २०१३ या वर्षांत नगरसेवकांनी ३१६ प्रश्न विचारले होते. त्या वेळी या माहितीवरून टीकेची झोडही उठली होती. मात्र त्यानंतरही रस्त्यांच्या नामांतरासाठीच नगरसेवकांनी आग्रह धरला. सलग चार वर्षे नामकरणाबाबत सातत्याने प्रश्न विचारले गेले. रस्त्यांविषयीही नगरसेवकांना प्रश्न पडत असून गेल्या चार वर्षांत पालिकेच्या सभागृह व विविध बैठकांमध्ये १४६१ प्रश्न विचारण्यात आले. रस्ते, नामकरण, इमारती यांच्यासोबत नगरसेवकांना महानगरपालिकेच्या कार्यालयीन कामकाजासंबंधीही अनेक शंका आहेत. त्यामुळे गेल्या चार वर्षांत ५५४ प्रश्न केवळ कारकून, शिपाई, अहवालांच्या वेळा इत्यादीसंबंधी विचारले गेले. विविध आस्थापनांना मिळणारे किंवा अडवून ठेवलेल्या परवान्याबाबतही नगरसेवकांनी आवाज उठवला, मात्र या सगळ्या प्राधान्यक्रमात शिक्षण, आरोग्य, पदपथ हे विषय बिनमहत्त्वाचे ठरले. मात्र, आता या मुद्दय़ांवरच नगरसेवकांनी पालिकेवर टीकेची झोड उठवल्याचे चित्र आहे.
नगरसेवकांनी नागरिकांचे आरोग्य, शहराचा विकास, सोयी-सुविधांसंबंधी प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. मात्र पदकाळ पूर्ण होत आलेला असतानाही नगरसेवकांना फक्त रस्ते, नामकरण, इमारती याबद्दलच प्रश्न विचारावेसे वाटतात हे लोकशाहीसाठी नक्कीच चांगले नाही, असे प्रजा फाऊंडेशनचे नीताई मेहता म्हणाले.
आरोग्याची अवस्था
* एप्रिल २०१२ ते मार्च २०१६ या चार वर्षांत मलेरियावगळता डेंग्यू, अतिसार व क्षयरोगाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.
* या चार वर्षांत क्षयरोगाचे तब्बल २५,०६७ मृत्यू झाले.
* डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत ६१ टक्के वाढ झाली, तर दरवर्षी मुंबईत सुमारे १ लाख १५ हजार रुग्णांना अतिसाराची बाधा होते.
गुन्हेगार नगरसेवक
* २३७ पैकी ५३ नगरसेवकांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.
* त्यापैकी २९ नगरसेवकांवर २०१२ पूर्वी गंभीर गुन्हे दाखल असल्याचे त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात लिहिले होते.
* २८ नगरसेवकांवर गेल्या साडेचार वर्षांत नवीन गुन्हे दाखल झाले आहेत.
नगरसेवकांच्या प्रश्नांची आकडेवारी
रस्ते १४६१
नामकरण १३२०
इमारती ७२५
पालिका कामकाज ५५४
परवाने ३७०
पदपथ ९२
(कालावधी : २०१२ ते १६)