मुंबई : कुर्ला (पश्चिम) येथील विविध ठिकाणच्या पदपथावरील अनधिकृत दुकाने आणि दुकानांच्या वाढीव बांधकामावर मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईअंतर्गत एकूण ७१ बांधकामे महापालिकेने जमीनदोस्त केली. पालिकेच्या ‘एल’ विभागाने मंगळवारी ही निष्कासनाची कारवाई केली.

महानगरपालिका आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी यांच्या आदेशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली, ‘परिमंडळ ५’चे सह आयुक्त देवीदास क्षीरसागर यांच्या देखरेखीत आणि एल विभागाचे सहायक आयुक्त धनाजी हेर्लेकर यांच्या नेतृत्वात ही कारवाई हाती घेण्यात आली होती. कुर्ला (पश्चिम) येथील कुर्ला रेल्वे स्थानक परिसर, न्यू मिल मार्ग, बैल बाजार परिसर, विनोबा भावे नगर आदी परिसरात ही कारवाई करण्यात आली.

याअंतर्गत परिसरातील अनधिकृत फेरीवाले, पदपथावरील अनधिकृत दुकाने, तसेच दुकानांची वाढीव बांधकामे अशा एकूण ७१ बांधकामांचे निष्कासन करण्यात आले. यामध्ये, कुर्ला पोलिस ठाणे हद्दीतील ५३, तर विनोबा भावे नगर पोलिस ठाणे हद्दीत १८ कारवाया करण्यात आल्या. त्यात अनधिकृत फेरीवाले, दुकाने व दुकानांचे वाढीव बांधकाम यांचा समावेश आहे.

या कारवाईसाठी अतिक्रमण निर्मूलनाची ४ वाहने, २ जेसीबी आणि अन्य संयंत्राच्या सहाय्याने हे निष्कासन करण्यात आले. यासाठी महानगरपालिकेचे ४६ अधिकारी – कर्मचारी यांच्यासह पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, संबंधित परिसरातील अनधिकृत तसेच नियमांचे पालन न करणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात सक्तीची कारवाई करण्याबाबत ‘एल’ विभागाकडून संबंधित पोलिसांना कळविण्यात आले. यापुढेही अनधिकृत बांधकामांविरोधात निष्कासनाची कारवाई सुरूच राहील, असे महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले.