मुंबई : राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित असलेल्या माहीम किल्ल्याचे संवर्धन आणि पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका आणि सीमाशुल्क विभाग यांच्यात गुरुवारी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात सामंजस्य करार करण्यात आला. ऐतिहासिक पुरातन वारसा असलेला माहीम किल्ल्यावरील अतिक्रमण हटवण्यात आल्यानंतर तब्बल अडीच तीन वर्षांनी या कामाला गती मिळाली आहे.

आता हा किल्ला पर्यटन स्थळाच्या रुपात विकसित करण्यात येणार असून मुंबईकरांना विरंगुळ्याचे एक ठिकाणही मिळणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे जी (उत्तर) विभाग कार्यालय, सीमाशुल्क विभाग, पुरातन वारसा संवर्धन सल्लागार मेसर्स विकास दिलावरी आणि वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेचे संरचनात्मक अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. के. के. सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली माहीम किल्ल्याची पुनर्स्थापना व संवर्धनाचे काम हाती घेण्यात येणार आहे. ऐतिहासिक वारसा असलेला हा किल्ला गेल्या काही वर्षांपासून अतिक्रमणाखाली गाडला गेला होता. सीमाशुल्क विभागाच्या अखत्यारित असलेल्या या किल्ल्यावरील अतिक्रमण मुंबई महापालिकेने हटवल्यानंतर आता या किल्ल्याचे संवर्धन करण्यात येणार आहे. त्याबाबत गुरुवारी करार करण्यात आला.

यावेळी पालिका आयुक्त आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, सीमाशुल्क विभागाचे प्रधान आयुक्त अजयकुमार पांडे, सीमाशुल्क विभागाचे अतिरिक्त आयुक्त नितीन तगाडे, विक्रम फडके,उपआयुक्त प्रशांत सपकाळे, सहायक आयुक्त योगेश देसाई, पुरातन वारसा संवर्धन सल्लागार विकास दिलावरी, वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेतील संरचनात्मक अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. के. के. सांगळे आदी यावेळी उपस्थित होते. माहीम किल्ल्यावरील अतिक्रमण निष्कासित करुन तेथे वास्तव्यास असलेल्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यामुळे, आता या किल्ल्यास त्याचे वैभव आणि सौंदर्य प्राप्त करुन देण्यास मदत होईल अशी अपेक्षा आयुक्त आश्विनी भिडे यांनी व्यक्त केली.

२० कोटींची तरतूद …

या सामंजस्य कराराअंतर्गत माहीम किल्ल्याच्या जीर्ण झालेल्या संरचनेचे सक्षमीकरण व पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. किल्ला परिसरातील ऐतिहासिक विहिरीचा शोध व उत्खनन केले जाणार आहे.

किल्ल्याच्या आतील परिघाभोवती पादचारी मार्ग विकसित करण्यात येईल. तसेच, किल्ल्याच्या पायाभरणीचे संरक्षण करण्यासाठी संरक्षक तटबंदी बांधण्यात येईल. यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. माहीम किल्ल्याच्या विद्यमान संरचनेवर झोपडपट्टी स्वरूपातील अतिक्रमणे झाली होती. या संपूर्ण क्षेत्राचे सर्वेक्षण आणि रहिवाशांच्या वैध कागदपत्रांची पडताळणी करुन २७५ झोपडीधारकांचे पुनर्वसन कुर्ला व मालाड येथील प्रकल्पग्रस्तांसाठी उपलब्ध असलेल्या सदनिकांमध्ये करण्यात आले आहे. त्याकरीता २५ कोटी खर्च करण्यात आले आहेत. किल्ल्यावरील एका धार्मिक संरचनेच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

किल्ल्यावर सीमाशुल्क विभागाचे संग्रहालय

सीमाशुल्क विभागाचे प्रधान आयुक्त अजयकुमार पांडे म्हणाले, ऐतिहासिक पुरातन वारसा असण्यासोबतच सीमाशुल्क विभागाचे कस्टम स्टेशन म्हणून माहीम किल्ल्याची ओळख आहे. महानगरपालिकेने हाती घेतलेल्या संवर्धन आणि पुनरुज्जीवनाच्या कामकाजामुळे या किल्ल्यास लौकिक प्राप्त होईल. तसेच, मुंबईकरांसाठी पर्यटनस्थळ म्हणून हा किल्ला विकसित होईल. तसेच या किल्ल्यावर सीमाशुल्क विभागाचे संग्रहालय तयार केले आहे.

माहीम किल्ल्याविषयी ….

माहीम पुरातन किल्ला असून राजा बिंबदेव यांच्या वंशजांनी सुमारे बाराव्या आणि तेराव्या शतकात हा किल्ला बांधला. मुंबईच्या सात बेटांपैकी माहीम हे सत्तेचे प्रमुख केंद्र होते आणि हा किल्ला त्या वैभवशाली इतिहासाचे प्रतीक आहे. महाराष्ट्र शासनाने १९७५ मध्ये माहीम किल्ल्यास राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ सुमारे ३ हजार ७९६.०२ चौरस मीटर आहे. सध्या हा किल्ला सीमाशुल्क विभागाच्या अखत्यारित आहे.