मुंबई : मुंबई महापालिकेच्या विविध मोठमोठ्या प्रकल्पांची व विविध विकासकामांची देणी तब्बल २ लाख ३२ हजार कोटींच्या पुढे गेली आहेत. सागरी किनारा मार्गाचा उपनगरातील टप्पा, जलबोगद्यांची कामे, गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता, रस्त्यांच्या कॉँक्रीटीकरणाची कामे अशा मोठमोठ्या प्रकल्पांबरोबरच दैनंदिन देखभालीच्या कामांची देणी यात समाविष्ट आहेत.

येत्या आर्थिक वर्षात त्यासाठी ३५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पालिकेच्या एकूण मुदतठेवी सुमारे ८२ हजार कोटी रुपये इतक्या आहेत. या मुदतठेवींच्या तिप्पट प्रकल्पाची देणी आहेत. त्यामुळे येत्या काही वर्षात पालिकेची आर्थिक स्थिती कशी असेल याचा अंदाज येईल.

मुंबई महानगरपालिकेचा २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प नुकताच सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात कोणत्याही नवीन प्रकल्पाची घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र आधीच्याच प्रकल्पांची प्रचंड देणी पालिकेवर असून या कर्जाच्या ओझ्याखाली मुंबई महापालिका दबली असल्याचेच चित्र आहे. मुंबई महापालिकेतील नगरसेवकांची मुदत मार्च २०२२ मध्ये संपली. तेव्हापासून मुंबई महानगरपालिकेत प्रशासकांची राजवट सुरू आहे.

गेल्या काही वर्षांपासून मुंबई महापालिकेने मूलभूत कतर्व्यांच्या पलीकडे पायाभूत सुविधांची कामे हाती घेण्यास सुरुवात केली. मात्र आता या पायाभूत प्रकल्पांची संख्या आणि खर्च इतका वाढला आहे की पालिकेच्या उत्पन्नाहून अधिक या प्रकल्पांची देणी आहेत. त्यामुळे श्रीमंत महानगरपालिकेच्या तिजोरीवरील ताण वाढू लागला आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात मोठ्या प्रकल्पांमुळे महापालिकेतील प्रकल्पांची देणी तब्बल १.९० लाख कोंटीवर गेली होती.

या कामांचा समावेश

एकूण तब्बल ५६ मोठ्या प्रकल्पांची देणी महापालिकेला येत्या काही वर्षात द्यायची आहेत. ही देणी १ लाख ९३ हजार कोटींची आहेत. त्यात रस्ते कॉंक्रीटीकरणाची कामे, गोरेगाव – मुलुंड जोड रस्ता, वर्सोवा – दहिसर सागरी किनारा, दहिसर – भाईंदर जोडरस्ता या कामांचा समावेश आहे. तर आरोग्य, घन कचरा, इमारत परिक्षण अशा पालिकेच्या विविध खात्यांच्या लहान-मोठ्या कामांची ३९ हजार कोटींची देणी आहेत.

प्रकल्प

● सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प २९,३४४ कोटी

● गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता १३,९९४ कोटी

● वर्सोवा-दहिसर किनारी रस्ता : ३३,५१२ कोटी ●जलवहन बोगदे : १७,६०२ कोटी

● रस्ते व जंक्शन कॉंक्रीटीकरण : १७,७३३ कोटी

Story img Loader