मुंबई : भांडुपमधील धोकादायक ठरलेल्या ३० शौचालयांची पुनर्बाधणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून त्यासाठी २० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. दुरुस्तीचा खर्च जास्त असल्यामुळे डागडुजीऐवजी शौचालयाची पुनर्बाधणी करण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे. मात्र एका शौचालयाच्या पुनर्बाधणीसाठी सरासरी ६८ लाख रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे या विषयावरून प्रशासन विरुद्ध नगरसेवक असा नवा वाद रंगण्याची चिन्हे आहेत.

भांडुपमध्ये मुंबई मलनिस्सारण विल्हेवाट प्रकल्पाअंतर्गत (एमएसडीपी) ९४ शौचालये बांधण्यात आली होती. अनेक वर्षे झाल्यामुळे या शौचालयांचे संरचनात्मक परीक्षण करण्यात आले होते. त्यापैकी १९ शौचालये ही दोषदायित्व कालावधीत आहेत, तर उर्वरित ७५ शौचालयांपैकी नऊ शौचालये अतिधोकादायक स्थितीत असल्यामुळे ही शौचालये पाडण्यात आली. अन्य ६६ शौचालयांची दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. या ६६ शौचालयांपैकी ४३ शौचालयांच्या दुरुस्तीचा खर्च नवीन बांधकामांच्या खर्चाच्या तुलनेत ४५ टक्क्यांनी अधिक असल्यामुळे त्यापैकी ३० शौचालयांची पुनर्बाधणी करण्याचे प्रशासनाने ठरवले आहे, तर उर्वरित २३ ठिकाणच्या शौचालयांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा विषय विचारात घेण्यात आला नव्हता. मुंबईतील झोपडपट्टी परिसरात अनेक ठिकाणी धोकादायक शौचालये असून नागरिक जीव मुठीत धरून त्याचा आजही वापर करीत आहेत. मात्र अशी धोकादायक स्वरूपातील शौचालये वेळीच दुरुस्त अथवा पुनर्बाधणी न केल्याने कोसळून दुर्घटना घडतात व त्यामुळे जीवितहानी होते. त्यामुळे या विषयाला विशेष महत्त्व आहे.