मुंबई : महाराष्ट्र सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाची परवानगी न घेतल्यामुळे बोरिवलीतील एरंगळ परिसरातील मिलेनियर सिटी स्टुडिओ, तर आवश्यक परवानगीची कागदपत्रे सादर करण्यात अपयशी ठरल्याने मालाड येथील सोनी कॉम्प्लेक्स लिंक रोडवील एक्स्प्रेशन स्टुडिओ मुंबई महानगरपालिकेने जमीनदोस्त केला.या परिसरात आवश्यक परवानगी न घेताच स्टुडिओ उभारण्यात आल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. 

हेही वाचा >>> महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेल्यावरून राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “असा प्रकल्प निसटलाच…”

या संदर्भात तक्रार दाखल होताच उपविभागीय अधिकारी, मुंबई पश्चिम उपनगरे यांनी संयुक्त स्थळपाहणी केली. या स्थळपाहणीनंतर उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल सादर करण्यात आला आहे. ब्एरंगळ परिसरात उभारण्यात आलेल्या मिलेनियर सिटी स्टुडिओ एलएलपी यांना ३ ऑगस्ट २०२१ ते २५ मे २०२२ या कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरुपाचे बांधकाम करण्याची परवानगी महापालिकेकडून देण्यात आली होती. मात्र या प्रकरणी महाराष्ट्र सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाची परवानगी घेणे आवश्यक आहे. प्राधिकरणाची परवानगी नसल्यामुळे पी-उत्तर विभागामार्फत देण्यात आलेली तात्पुरती परवानगी रद्द करावी आणि एरंगळ येथे केलेले बांधकाम तात्काळ निष्कासीत करावे, असे जिल्हा सागरतटीय सनियंत्रण समिती तथा उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने पी-उत्तर विभाग कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांना पत्रात नमूद केले आहे. या पत्राची दखल घेऊन पी-उत्तर विभाग कार्यालयाने मिलेनियर सिटी स्टुडिओवर हातोडा चालविला.

मालाड परिसरातील एक्स्प्रेशन स्टुडिओला २ मार्च २०२१ रोजी अर्धपक्की शेड/सेट उभारण्यासाठी पी-उत्तर विभाग कार्यालयाने तात्पुरत्या स्वरुपाची परवानगी दिली होती. यासाठी आवश्यक असलेली महाराष्ट्र सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण, पर्यावरण विभागाची आवश्यक परवानगीची प्रत सादर करण्याची सूचना केली होती. परंतु परवानगीची प्रत सादर करण्यात एक्स्प्रेशन स्टुडिओचे व्यवस्थापन अपयशी ठरले. त्यामुळे त्पी-उत्तर विभागाने हे बांधकाम जमीनदोस्त केले.