मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठ्याबाबतच्या तक्रारींमध्ये वाढ झाली असून दूषित पाण्याच्या तक्रारीही येऊ लागल्या आहेत. त्यामुळे या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी विशेष पथके तैनात करावी, असे आदेश अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी प्रशासनाला दिले. या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी परिमंडळ निहाय पथके स्थापन करून आठवड्याचे सातही दिवस २४ तास ही कामे करावी, असेही आदेश बांगर यांनी दिले.

मुंबईत सध्या सुरू असलेली रस्त्यांची कामे, उन्हाळ्यात वाढणारी पाण्याची गरज आणि आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याची एक विशेष आढावा बैठक महानगरपालिका मुख्यालयात गुरुवारी सायंकाळी आयोजित करण्यात आली होती. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनात आयोजित या बैठकीला उप आयुक्त पुरूषोत्तम माळवदे यांच्यासह जल अभियंता खात्यातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

काही ठिकाणांहून पाणीपुरवठ्याबाबतच्या तक्रारी येत आहेत. या तक्रारींचे संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित निराकरण करावे आणि पाणीविषयक सर्वच तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन त्यांचा निपटारा योग्य वेळेतच करावा. त्यासोबतच दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारींचा तातडीने आणि सर्वोच्य प्राधान्याने निपटारा करावा, असे निर्देश बांगर यांनी दिले. तसेच जलवाहिन्यांमधून होणारी गळती तातडीने शोधून काढावी, गळती शोधून काढण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी पथके तैनात करावी, असेही निर्देश बांगर यांनी दिले.

स्थळ पाहणी करावी

गेल्या काही दिवसांपासून अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी काही ठिकाणांहून येत आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी विनाविलंब स्थळ पाहणी करावी. या पाहणीदरम्यान प्राप्त झालेल्या तक्रारीत तथ्य असल्याचे आढळल्यास विनाविलंब योग्य त्या उपाययोजना तातडीने कराव्यात. या उपाययोजनांमध्ये आवश्यक तेथे पाणीपुरवठ्याच्या सध्याच्या वितरण यंत्रणेमध्ये काही बदल करण्याची आवश्यकता असल्यास ते बदल करावे, असेही निर्देश बांगर यांनी दिले.

लोकप्रतिनिधींना अवगत करा

अपुऱ्या पाणीपुरवठ्याबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींना अवगत करावे. शक्यतो लोकप्रतिनिधींच्या सोबत पाहणी दौरे करावेत, अशाही सूचना बांगर यांनी आढावा बैठकीदरम्यान दिल्या.

तक्रार गांभीर्याने घ्या

दूषित पाण्याबाबतची तक्रार ही अत्यंत गांभीर्याने घेतली जावी. या तक्रारींबाबत कार्यवाही करताना कमालीची तत्परता दिसणे आवश्यक आहे. दूषित पाण्याच्या तक्रारींबाबत विनाविलंब कार्यवाही झाली नाही, तर त्याचा परिणाम अत्यंत गंभीर होऊ शकतो. तसेच याबाबत सर्व यंत्रणांनी अत्यंत संवेदनशील राहणे गरजेचे आहे, अशाही सूचना अभिजीत बांगर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

जबाबदारी निश्चित करा

पाणीपुरवठाविषयक प्रकल्प विहित वेळेत पूर्ण होण्यास अडचणी येत असतील, तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अभियंत्यांना आवश्यकतेनुसार सहकार्य व मदत करावी. तसेच कुणी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असेल, तर याबाबत जबाबदारी निश्चित करण्यासह संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असाही इशारा यावेळी बांगर यांनी दिला.