मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उत्सव साजरा करताना कोणती काळजी घ्यावी, आपत्कालीन परिस्थिती उद््भवू नये यासाठी कोणती खबरदारी घ्यावी, आपत्ती उद््भवलीच तर आपत्कालीन व्यवस्थापन कसे करावे, याबाबत महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मंडळातील किमान ८ ते १० स्वयंसेवकांना एकदिवसीय प्रथम प्रतिसादक आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
गणेशोत्सवात दर्शनासाठी होणारी गर्दी, विद्युत अपघात, आग, आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती कशी हाताळावी याबाबत प्रशिक्षणात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच प्रथमोपचार व सीपीआरबाबतही प्रात्यक्षिकांद्वारे माहिती देण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या सर्व २६ प्रशासकीय विभागांतील हे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी प्रशासकीय विभाग कार्यालयाकडून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांशी समन्वय साधण्यात येणार आहे. तसेच, यंदाचा गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी महानगरपालिकेने नियोजन व कार्यवाही सुरू केली आहे. महानगरपालिका प्रशासनाकडून विविध सेवा-सुविधा पुरवितांना पर्यावरणपूरक शक्य तितक्या बाबींचा अवलंब केला जात आहे.
मुंबईतील गणेशोत्सव महाराष्ट्रासह संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. लाखो भाविक, पर्यटक या उत्सवासाठी मुंबईत येतात. विविध सार्वजनिक मंडळांनी साकारलेले देखावे पाहण्यासाठी देशभरातून भाविक मुंबईत येत असतात. त्यामुळे मंडळांच्या मंडपांमध्ये, परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. अशावेळी गर्दीचे नियोजन कसे करावे, कोणतीही दुर्घटना होवू नये यासाठी कोणती काळजी घ्यावी, प्रसाद वाटप करताना कोणती दक्षता घ्यावी, आपत्कालीन कार्यवाही कोणती व कशी असावी, याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रत्येक गणेश मंडळातील किमान ८ ते १० स्वयंसेवकांना एकदिवसीय प्रशिक्षण दिले जाणार आहे. आपत्कालीन व्यवस्थापनात नागरी सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण महत्त्वाचे ठरणार आहे.
या प्रशिक्षणात महानगरपालिका आपत्कालीन व्यवस्थावन विभागाचे अधिकारी, मुंबई अग्निशमन दलाचे अधिकारी, विद्युत पुरवठा आणि परिवहन विभागाचे अधिकारी, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक, पोलीस अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळांनी महानगरपालिकेच्या या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
