इंद्रायणी नार्वेकर, लोकसत्ता

मुंबई : आधीच विशेष निधीतून ‘फूड ट्रक’ देण्यावरून पालिका वर्तुळातील वातावरण तापलेले असताना आता याच निधीतून फिरते वाचनालय सुरू करण्यात येणार आहे. पालिकेच्या ‘ई’ विभागात विशेष निधीतून बेरोजगारांसाठी ‘लायब्ररी व्हॅन’ देण्यात येणार आहे. काही ठरावीक नगरसेवकांनाच विशेष निधी मिळाला असल्यामुळे या विषयावरूनही येत्या काळात वाद होण्याची शक्यता आहे.

या वर्षी अनेक नगरसेवकांनी आपल्या विशेष निधीतून फूड ट्रक देण्याची तयारी केली होती. मात्र फूड ट्रकबाबत धोरण येत नाही, तोपर्यंत अशा फिरत्या अन्न वितरण वाहनांच्या वितरणाची कार्यवाही करू नये, असे परिपत्रकच नियोजन विभागाने काढले होते. त्यामुळे एकतर ज्या नगरसेवकांनी अशा फूड ट्रकसाठी विशेष निधी मिळवला होता अशा नगरसेवकांमध्ये नाराजी होती. तसेच ज्या नगरसेवकांना विशेष निधी मिळाला नाही, त्यांचाही अशा फूड ट्रक वितरणाला विरोध होता. अशा पद्धतीने ठरावीक नगरसेवकांना आपापल्या विभागात फूड ट्रक वितरित करण्याची संधी मिळत असेल तर तो इतर प्रभागांवर आणि नगरसेवकांवर अन्याय ठरेल, अशीही भावना काही नगरसेवकांनी व्यक्त केली होती.

विशेष निधी मिळवण्याची ही स्पर्धा चुकीची असल्याचेही मत काही नगरसेवकांनी व्यक्त केले होते. त्यानंतर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी फूड ट्रकबाबत धोरण ठरवण्यासाठी विशेष बैठकही बोलवली होती. हा विषय ताजा असतानाच आता विशेष निधीतून फिरते वाचनालय देण्याची तयारी ‘ई’ विभागाने केली आहे. बेरोजगारांना हे वाचनालय चालवायला दिले जाणार आहे. त्यासाठी ‘ई’ विभागाने अशा फिरत्या वाहनाचा पुरवठा करण्याबाबत निविदा काढली आहे.

दरम्यान, फूड ट्रकवरून वाद सुरू असल्यामुळे फिरत्या वाचनालयाबाबतही हाच वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. फूड ट्रकमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ शकतो, असा मुद्दा पढे आला होता. तसेच आता फिरते वाचनालय कुठे उभे करायचे, ते चालवायला देताना कोणते निकष ठरवावे असे अनेक मुद्दे उपस्थित होणार आहेत. 

फिरते वाचनालय असे..

* साधारण एक हजार पुस्तके मावतील अशी या वाहनात सोय असणार आहे.

* एक ते दोन व्यक्तींना बसून वाचता येईल अशी सुविधाही या फिरत्या वाचनालयात असेल.

हा विषय नियोजन विभागाकडे पाठवणार असून त्यांचेही याबाबत मत घेतले जाईल.

मनीष वळंजू, साहाय्यक आयुक्त, ‘विभाग