मुंबई : मुंबई महानगरपालिका प्रशासनाने शिक्षण विभागाचा २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा ४२४८.०८ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प बुधवारी शिक्षण समिती अध्यक्षांकडे सादर केला. चालू आर्थिक वर्षातील सुधारित अर्थसंकल्पाच्या तुलनेत यात ५७३.९८ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. आगामी वर्षात राष्ट्रीय छात्रसेना उपक्रम, इंग्रजी भाषा प्रयोगशाळा, विज्ञान पार्क, पर्यावरण संवर्धन आदी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प अर्थसंकल्पात सोडण्यात आला आहे.

महानगरपालिकेच्या मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, गुजराती, कन्नड,तेलुगू व तमिळ अशा आठ माध्यमांसाठी ९३१ प्राथमिक शाळेतील एकूण २,७६,११५ विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. त्यासाठी पालिका शाळांमध्ये एकूण ७४५३ शिक्षक कार्यरत आहेत. शाळांचा दर्जा व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात विशेष उपक्रम सुरू केले असून त्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. आगामी वर्षात विद्यार्थ्यांसह पर्यावरण संवर्धनाचे धडे, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरपी साहित्य, शैक्षणिक सहली, खगोलशास्त्रीय प्रयोगशाळा, अत्याधुनिक बैठक व्यवस्था, शाळांची दर्जोंन्नती व पुनर्बांधणी पोक्सो कायद्याबाबत मार्गदर्शन आदी उपक्रम राबविले जाणार आहेत. आगामी वर्षात शाळांची दुरुस्ती, दर्जोंन्नती, पुनर्बांधणी व नवीन बांधकामांची एकूण ५७ कामे पूर्ण करण्यात येणार असून उर्वरित कामे पुढील वर्षात पूर्ण केली जातील. त्यासाठी अर्थसंकल्पात पालिकेने ३४० कोटींची तरतूद केली आहे.

समाजातील वाढती व्यसनाधीनता लक्षात घेऊन पालिकेने या वर्षात ड्रग्स व व्यसनाधीनतेच्या दुष्परिणामावर विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना लहान वयातच पर्यावरणाचे महत्व समजण्यासाठी व शाश्वत सवयी विकसित करण्यासाठी इयत्ता ५ वी ते इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी ‘इको वॉरियर्स’ शैक्षणिक पुस्तकांसह पर्यावारण संवर्धन उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांच्या कृतीतून पर्यावरण पूरक उत्पादने बनविणे, टाकाऊ पदार्थांचा पुनर्वापर करणे, विटा बनविणे, तसेच कच-यापासून उपयुक्त वस्तू तयार करण्यात येणार आहेत. यासाठी अर्थसंकल्पात तब्बल १२.४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महानगरपालिका शिक्षण विभागाद्वारे चालविल्या जाणाऱ्या विशेष (दिव्यांग) शाळांतील विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास होण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेद्वारे विविध प्रकारच्या थेरपी देण्याची सोय केली जाते. थेरपी अधिक प्रभावी पद्धतीने देण्याकरिता आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याचा पालिकेचा मानस आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत महापालिकेच्या ५५ शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर खगोलशास्त्रीय प्रयोगशाळा उभारण्यात आल्या असून आगामी म्हणजेच शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये आणखी ४० शाळांमध्ये खगोलशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी ३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांसाठी सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षांपासून प्रत्येक वर्षी शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात पालिकेने प्राथमिक विभागासाठी ६.०७ कोटी, तर माध्यमिकसाठी १९ लाख रुपयांची तरतूद केली आहे.

बेस्टमार्फत मोफत बस सेवा; ९ हजार विद्यार्थ्यांना ‘चलो कार्ड’ चे वितरण

गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना बेस्टमार्फत मोफत सेवा पुरविली हवी, अशी मागणी पालक व शिक्षण कार्यकर्त्यांकडून केली जात होती. त्यानुसार पालिकेने महानगरपालिकेच्या इयत्ता १ ली ते इयत्ता १० वी तील गणवेषधारी विद्यार्थ्यांना त्यांच्या निवासस्थानापासून ते शाळेपर्यंत बेस्टमार्फत मोफत बस प्रवास सुविधा उपलब्ध करुन दिली. तसेच ज्या मार्गावर बेस्ट बसची सुविधा उपलब्ध नाही, अशा मार्गावर बेस्टमार्फत विशेष बस सेवा पुरविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सन २०२५-२६ मध्ये (जुलै २०२५ ते नोव्हेंबर २०२५ पर्यंत) प्राथमिक शाळांतील ६,०१८ व माध्यमिक शाळांतील ३,६०९ अशा एकूण ९,६२७ विद्यार्थ्यांना ‘चलो कार्ड’ चे वितरण करण्यात आले आहे.

वाचन संस्कृतीला चालना

महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना वाचन व स्वअध्ययनाची सवय लावणे तसेच भाषिक कौशल्ये वाढवण्यासाठी शाळेतील वाचनालये अद्ययावत करण्याचे लक्ष्य आहे. त्यासाठी वाचनालयांस शैक्षणिक पुस्तके, स्पर्धा परीक्षा पूरक पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार असून मुलभूत भौतिक सुविधा देखिल अद्ययावत करण्यात येणार आहेत. त्यासाठी पालिकेने अर्थसंकल्पात ५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.