मुंबई : धुक्यात हरवलेली वाई, कृष्णा नदीचा काठ, महागणपतीच्या मंदिरावर पडलेले सकाळचे कोवळे ऊन, पाचगणीच्या डोंगररांगामध्ये विसावलेली सायंकाळ, पुरातन मंदिरांभोवतीची निरव शांतता आदींचा अनुभव घेण्याची संधी मुंबईकरांच्या मनमोहक चित्रांच्या माध्यमातून मिळणार आहे. महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने महापालिकेच्या कला अकादमीच्या ‘आर्टिस्ट कॅम्प’मधील निवडक चित्रांचे प्रदर्शन वरळीतील नेहरू सेंटरच्या आर्ट गॅलरीत आयोजित केले आहे. हे प्रदर्शन १ ते ६ एप्रिल या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत कलाप्रेमींसाठी खुले राहणार आहे.
महानगरपालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत असलेल्या कला अकादमीतील कला शिक्षकांची चार दिवसीय निसर्गचित्रण कार्यशाळा डिसेंबर २०२५ मध्ये सातारा जिल्ह्यातील वाई येथे पार पडली. या कार्यशाळेत सहभागी झालेल्या शिक्षकांनी वाई, पाचगणी, मेणवली, धोम धरण, नृसिंह मंदिर, तीर्थक्षेत्र संगम माहुली या ठिकाणचे निसर्गचित्र साकारले. या कार्यशाळेतील निवडक चित्रकृतींचे प्रदर्शन वरळीतील नेहरू सेंटर येथील आर्ट गॅलरीत भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात ३५ चित्रकारांच्या ७० निवडक चित्रांचा समावेश असून महानगरपालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांच्या हस्ते बुधवारी पार पडले. महानगरपालिकेच्या कला शिक्षकांनी वाई तालुक्यातील निसर्ग रंगांच्या रुपात जिवंत केला आहे.
आर्टिस्ट कॅम्पच्या माध्यमातून वाई, पाचगणीतील अनेक परिसर, मंदिरे आपल्या कुंचल्यातून साकारून प्रत्येक चित्रकाराने एक वेगळीच दुनिया उभी केली. हा अतिशय आनंददायी उपक्रम आहे. शिक्षकांमधील कलागुणांना यातून वाव मिळतो. निसर्गाशी एकरूप होणारे हे प्रदर्शन असल्याचे मत राजेश्री शिरवडकर यांनी व्यक्त केले.
कला अकादमीचे प्राचार्य दिनकर पवार यांनी आर्टिस्ट कॅम्पची संकल्पना स्पष्ट केली. चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर शिरवडकर यांनी संपूर्ण प्रदर्शनाला भेट दिली. शिरवडकर यांना कलेविषयी आवड असल्याने त्यांनी प्रत्येक चित्रातील बारकावे टिपले. प्रत्येक कलाशिक्षकांकडून त्यांनी साकारलेल्या चित्राविषयी माहिती घेतली. दरम्यान, हे प्रदर्शन अधिकाधिक मुंबईकरांनी पाहावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाद्वारे करण्यात आले आहे. उद्घाटन प्रसंगी उपशिक्षणाधिकारी मुख्तार शहा, निसार खान, विनोद कदम, अधीक्षक लक्ष्मण गोसावी यांच्यासह अन्य प्रशासकीय अधिकारी, कला अकादमीचे निदेशक व शिक्षक आदी उपस्थित होते.
