मुंबई : महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी, अधीक्षक, प्रशासकीय अधिकारी आणि शिक्षणाधिकारी कार्यालयात तब्बल ९१ लाख रुपयांच्या १९२ टेबल आणि २३६ खुर्च्या खरेदी करण्यास स्थायी समितीने बुधवारी मंजुरी दिली. उपशिक्षणाधिकारी व अधीक्षक यांच्यासाठी घेण्यात येणाऱ्या ११ खुर्च्यांसाठी जवळपास १ लाख ७५ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. अनेक महापालिकेच्या शाळा व वर्गखोल्यांची दुरावस्था झालेली असताना महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या टेबल – खुर्च्यांवर लाखो रुपये खर्च करण्यात येत असल्याबद्दल विरोधकांनी नाराजी व्यक्त केली.

महापालिकेच्या शिक्षण विभागाने केलेल्या मागणीनुसार साहित्य खरेदी करण्यास अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) यांची पूर्वीच मंजुरी प्राप्त झाली. त्यांनतर आवश्यक साहित्यासाठी शिक्षण विभागाद्वारे ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. महापालिकेने या साहित्यासाठी एकूण ७९ लाख ५१ हजार २०० रुपये खर्च अंदाजित केला होता. निविदा प्रक्रियेत या कामासाठी तीन कंत्राटदारांनी स्वारस्य दाखविले. महापालिकेच्या कार्यालयीन अंदाजापेक्षा १.९९ टक्के कमी दराने म्हणजे ७७ लाख ९२ हजार १९७ रुपयांमध्ये वरील साहित्य पुरविण्याची तयारी दर्शविणाऱ्या कंत्राटदारांला हे कंत्राट देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीला सादर केला. सर्व करांसह टेबल – खुर्च्या पुरवठ्याचा एकूण खर्च ९१ लाख ९४ हजार ७९२ रुपयांवर पोहोचला आहे. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी ठेवण्यात आला. विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील काही लोकप्रतिनिधींनी या प्रस्तावाबाबत प्रश्न उपस्थित केले.

मुंबई महानगरपालिका ही निमशासकीय संस्था असून त्यातील कर्मचारी – अधिकाऱ्यांच्या टेबल – खुर्च्यांसाठी तब्बल ९१ लाख रुपये खर्च करण्याची आवश्यकता काय, असा प्रश्न नगरसेविका मीनाक्षी पाटणकर यांनी उपस्थित केला. ही रक्कम विद्यार्थ्यांच्या गरजांसाठी खर्च करावी. तसेच, महानगरपालिकेने २०२२ पासून फर्निचरवर किती रुपये खर्च केले, याचीही माहिती सादर करावी, अशी मागणी त्यांनी केली. अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या टेबल – खुर्च्यांना विरोध नाही. मात्र, या साहित्याचा बाजारभाव तपासून पाहिला आहे का, असा प्रश्न उपस्थित करत एमआयएमच्या जमीर कुरेशी यांनी प्रस्तावाबाबत शंका उपस्थित केली. सत्ताधारी पक्षाच्या शीतल गंभीर यांनी जेम पोर्टलवरून साहित्य खरेदी करण्याची शिफारस केली. तेथून खरेदी केल्यास कमी दराने साहित्य उपलब्ध होऊ शकते. गेल्या वर्षी किती आणि कोणत्या दराने साहित्य खरेदी केले, याची माहिती सादर करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

कर्मचाऱ्यांच्या टेबल – खुर्च्यासाठी ९१ लाख रुपये खर्च करणे आवश्यक नाही. महापालिकेने शिक्षक व विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवावे. मात्र, ते प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्राधान्य दिले जात आहे. महापालिकेच्या अनेक शाळांची दुरवस्था झाली असून शौचालयांचीही बिकट अवस्था आहे. वर्गांमध्ये मुलांना बसायला व्यवस्थित बाक नाहीत. शिक्षकांच्या खुर्च्या मोडल्या आहेत. त्यामुळे महापालिकेने त्याकडे लक्ष द्यावे, असा मुद्दा उपस्थित करीत यशवंत किल्लेदार यांनी प्रस्तावाला आक्षेप घेतला. महापालिका उपशिक्षणाधिकारी व अधीक्षकांच्या खुर्चीसाठी सुमारे १५,९५० रुपये खर्च करण्याची तयारी दर्शवत आहेत. मात्र, बाजारभावापेक्षा ही रक्कम अधिक असून महापालिका जणू मोठमोठ्या खासगी कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या खुर्चीसाठी खर्च करत असल्यासारखे भासते.

साहित्य आणि तपशील

उपशिक्षणाधिकारी व अधीक्षक (शाळा) यांच्या कार्यालयातील एल टाईप टेबल – ११ उपशिक्षणाधिकारी व अधीक्षक (शाळा) कार्यालयातील खुर्च्या – ११

प्रशासकीय अधिकारी यांच्या कार्यालयातील टेबल – ३१ प्रशासकीय अधिकारी कार्यालयात खुर्च्या – ४६ मुख्य लिपिक /लिपिक कार्यालयात टेबल – १५० मुख्य लिपिक / लिपिक कार्यालयात खुर्च्या – १७९