मुंबईत काँग्रेसच्या मुस्लिम व्होट बँकेला धक्का; ज्येष्ठ नगरसेविकेचा एमआयएममध्ये प्रवेश

निवडणूक आखाड्यात पहिल्यांदाच एमआयएम

एमआयएम मुंबई महापालिका निवडणुकीच्या आखाड्यात

मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत पक्षांतराची लाट आलेली आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेविका वकारउन्निसा अन्सारी यांनी आज, मंगळवारी काँग्रेसला रामराम केला. मुंबई महापालिका निवडणुकीच्या रिंगणात पहिल्यांदाच उतरलेल्या ‘एमआयएम’मध्ये त्यांनी प्रवेश केला. ‘एमआयएम’मुळे काँग्रेसच्या मुंबईतील मुस्लिम व्होट बँकेला धक्का बसणार असल्याचे बोलले जात आहे. चार वेळा नगरसेविका म्हणून निवडून आले असताना मला डावलून नवख्यांना उमेदवारी दिल्याने आपण काँग्रेसला सोडचिट्ठी दिली आहे, असे अन्सारी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मुंबई महापालिकेच्या बी प्रभागातील वॉर्ड क्रमांक २२२ मधून काँग्रेसच्या तिकिटावर अन्सारी निवडून आल्या होत्या. यापूर्वी त्या समाजवादी पक्षात होत्या. यंदा पुन्हा निवडणूक लढण्यासाठी त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती; मात्र पक्षाने त्यांना नकार दिला. राजकारणाचा कोणताही अनुभव नसलेल्या नगरसेवक ज्ञानराज निकम यांच्या मुलीला उमेदवारी देण्यात येणार असल्याचे अन्सारी यांनी यावेळी सांगितले. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमधील संजय निरुपम आणि गुरुदास कामत यांच्यातील अंतर्गत वाद उफाळून आल्याने पक्षातील दुफळी चव्हाट्यावर आली असतानाच, एका ज्येष्ठ नगरसेविकेने पक्षाला रामराम केल्याने आता पक्षातील गळतीला सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात यंदा प्रथमच एमआयएममध्ये उतरणार आहे. मुंबईत मुस्लिम मतदार मोठ्या संख्येने आहे. हा मतदार काँग्रेस व समाजवादी पक्षाचा मतदार म्हणून ओळखला जातो. एमआयएममुळे मुस्लिम मते विभागणार असल्याने त्याचा फटका काँग्रेस व समाजवादी पक्षाला बसणार असल्याचे बोलले जाते. मात्र त्यापूर्वीच काँग्रेसमधील ज्येष्ठ नगरसेविकेने एमआयएमची वाट धरल्याने कॉंग्रेसला निवडणुकीपूर्वीच धक्का बसला आहे.

दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएमने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात १८ जणांचा समावेश आहे. ‘एमआयएम’ यंदा पहिल्यांदाच मुंबई महापालिकेची निवडणूक लढवत आहे. पहिल्या यादीत मुंबईच्या मुस्लिमबहुल भागातील उमेदवार असून, १८ जणांच्या यादीत ८ महिला उमेदवार आहेत. यात सहा मुस्लिम समाजाचे तर दोन मुस्लिमेत्तर उमेदवार आहेत. पहिल्या यादीतील १८ जागांमध्ये दिंडोशी, चारकोप, अंधेरी, वांद्रे, गोवंडी, चांदिवली, भायखळा, मुंबादेवी, मालाड मालवणी, सायन, धारावी या वॉर्डांचा समावेश आहे. एमआयएम या निवडणुकीत ५० जागांवर निवडणूक लढवणार आहे. त्यातील १८ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या आठवडाभरात उर्वरित जागांसाठीही यादी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती पक्षातील सूत्रांकडून देण्यात आली आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bmc election 2017 congress senior leader and corporator waqarunnisa ansari entered in mim

ताज्या बातम्या