मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी १९० अधिक मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. दाट लोकवस्ती असतानाही मुंबईत एकही मतदान केंद्र अतिसंवेदनशील नसल्याची माहिती मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिली. मतदानाचा टक्का वाढवण्याच्या उद्देशाने खासगी सोसायट्यांमध्ये अधिक मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. शहरातील सुमारे ७०० खासगी सोसायट्यांमध्ये नागरिकांच्या घरांच्या जवळ मतदान केंद्रे स्थापन केली जाणार आहेत.
मुंबई महापालिकेची निवडणूक जानेवारी महिन्यात होणार असून मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. मतदारांना मतदान केंद्रापर्यंत सहज पोहोचता यावे यासाठी विविध सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत.
मतदारांच्या अधिक जवळ मतदान केंद्रे असावीत, यासाठी विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत १९० अधिक मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान मुंबईत एकूण १०,११० मतदान केंद्रे होती. येत्या महापालिका निवडणुकीसाठी ही संख्या वाढवून सुमारे १०,३०० करण्यात आली असून यामुळे १९० नवीन मतदान केंद्रांची भर पडणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिली.
मुंबईत एकही मतदान केंद्र अतिसंवेदनशील नसल्याचे स्पष्ट करताना अश्विनी जोशी म्हणाल्या की, काही मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून वर्गीकृत करण्यात आली आहेत. ज्या ठिकाणी १० पेक्षा अधिक मतदान बूथ असतात, तेथे मतदारांची संख्या जास्त असल्याने गर्दी होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा ठिकाणांचा संवेदनशील यादीत समावेश करण्यात आला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दुबार मतदारांची यादी निश्चित
राज्य निवडणूक आयोगाच्या मतदारयादीतील दुबार मतदारांची अंतिम यादी निश्चित करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या यादीत ११ लाख १ हजार ५०८ दुबार मतदार होते. या मतदारयादीतील नावांचे साधर्म्य असलेले मतदार वगळण्यात आले असून मुंबईत आता खरे दुबार मतदार एकूण १ लाख ६८ हजार ३५० असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यापूर्वी दुबार मतदारांच्या नावासमोर चिन्हाकिंत करण्यात आले होते. मात्र तपासणीनंतर ९ लाख ३३ हजार १५७ मतदारांची नावे समान असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या मतदारांना दुहेरी मतदारांच्या यादीतून वगळण्यात आले आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून आता या मतदारांच्या नावासमोर लावलेली चिन्हे काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली. दुबार मतदारांची तपासणी करण्यासाठी मुंबई महापालिकेने संगणकीय प्रणाली विकसित केली होती. त्याच्या मदतीने हे काम काही दिवसांत पूर्ण करण्यात आले. निवडणूक कामात कार्यरत असलेल्या पालिका कर्मचाऱ्यांनी १ लाख २६ हजार ६१६ घरांना प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी केली. यापैकी ४८ हजार ३२८ मतदारांनी ‘ए’ फॉर्म भरून दिला असून, या फॉर्ममध्ये त्यांनी कोणत्या प्रभागात मतदार म्हणून राहायचे आहे, याची माहिती दिली आहे.
