मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना (ठाकरे)-मनसेकडून युती जाहीर करण्यात असली तरी बंडखोरी टाळण्यासाठी दोन्ही पक्षांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. ‘मातोश्री’ वर उमेदवारी अर्जासाठी बरीच गर्दी झाली होती. तेव्हा उमेदवारी मिळालेल्यांमध्ये जल्लोष तर उमेदवारी नाकारण्यात आलेल्यांमध्ये नाराजी पसरली होती. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना स्वत:च्या उमेदवारीसाठी तर माजी महापौर श्रद्धा जाधव या पुत्र पवनसाठी प्रतीक्षा करावी लागली.. तर उमेदवारीवरून आमदार वरुण सरदेसाई आणि आमदार अनिल परब यांच्यात मतभेदाचे नाट्य रंगले.

शिवसेना ठाकरे गटांकडून मुंबई महापालिकेसाठी १५०च्या आसपास जागांची तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात यादी जाहीर न करता उमेदवारांना मातोश्रीवर बोलावून थेट एबी फॉर्म देण्यात आले. शनिवारपासून सुरू झालेल्या या वाटपात स्वत: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी सहभाग घेतला. रविवारी रात्री उशिरापर्यंत तर सोमवारी सकाळी १०.०० वाजल्यापासूनच मातोश्रीतून फोन गेलेल्या उमेदवारांची तसेच इच्छुकांची गर्दी मातोश्रीबाहेर जमली.

अनेक प्रभागांत उमेदवारी देण्यावरून निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी विभागाप्रमुख, शाखाप्रमुख आणि समर्थकांच्या बैठकांमागून बैठका स्वत: उद्धव ठाकरे यांच्याकडून घेण्यात आल्या. सोमवारी सायंकाळपर्यंत १२५ उमेदवारांना अर्ज वाटप करण्यात आले. ठाकरे गट नेमक्या किती जागा लढवणार आणि उमेदवारांची अंतिम यादी उद्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी ३ नंतर स्पष्ट होणार आहे.

माजी महापौरांचा ठिय्या

माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि माजी महापौर श्रद्धा जाधव यांना उमेदवारीसाठी मातोश्रीवर ठिय्या द्यावा लागला. किशोरी पेडणेकर यांना स्वत:च्या उमेदवारीसाठी मातोश्रीवर अर्जवाटप सुरू झाल्यापासून चार फेऱ्या माराव्या लागल्या. अखेर सोमवारी सायंकाळी प्रभाग क्र. १९९मधून त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले तर शेजारील प्रभागात शिवसेना शाखाप्रमुख गोपाळ खाडे यांच्या पत्नीला आबोली खाडे यांना तर विभागप्रमुख आशीष चेंबुरकर यांच्या पत्नीला उमेदवारी जाहीर करण्यात आली.

माजी महापौर श्रद्धा जाधव या पुत्र युवासेना पदाधिकारी पवन जाधव यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होत्या. मात्र याच विभागात आजी-माजी शाखाप्रमुखांनी उमेदवारीचा आग्रह धरल्याने तिढा निर्माण झाला. हा तिढा सोडवण्यासाठी श्रद्धा जाधव यांना मातोश्रीवर प्रतीक्षेत राहावे लागले. तर विधान परिषद आमदार सुनील शिंदे हे आपले बंधू निशिकांत शिंदे यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील असल्याचे पाहायला मिळाले, अखेर प्रभाग क्र. १९४मधून निशिकांत शिंदे यांना तिकीट मिळाले तर ही जागा मनसेला न सुटल्याने मनसे पदाधिकारी संतोष धुरी हेही नाराज आहेत. माजी महापौर स्नेहल आंबेकर यांना तिकीट मिळवण्यात अपयश आले.

वरुण सरदेसाई-अनिल परब यांच्यात जुंपली प्रभाग क्र. ९५ मधील उमेदवारीवरून ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई आणि आमदार अनिल परब यांच्यात खडाजंगी झाली, माजी नगरसेवक चंद्रशेखर वायंगणकर यांना उमेदवारी मिळावी यासाठी परब आग्रही होते. तर शिवसेनेचे माजी विभागप्रमुख दिवंगत श्रीकांत सरमळकर यांचे जावई हरी शास्त्री यांना उमेदवारी मिळावी यासाठी सरदेसाई यांचा आग्रह होता.

हरी शास्त्री यांनी विधानसभा निवडणुकीत आपल्या विजयासाठी मोलाची मदत केल्याचे म्हणणे सरदेसाई यांचे होते. अखेर ठाकरे यांनी सरदेसाई यांच्या बाजूने कौल दिल्याने हरी शास्त्री यांना उमेदवारी मिळाली तर संतप्त झालेले अनिल परब हे बैठक अर्धवट सोडून निघून गेले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र ते पुन्हा मातोश्रीवर हजर झाले. तर सरदेसाई यांनी असे कोणतेच मतभेद न झाल्याचे सांगितले.