मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया गुरुवार, १५ जानेवारी रोजी होणार असून त्यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जीवनावश्यक सेवेत कार्यरत अधिकारी- कर्मचाऱ्यांना सुट्टी देणे शक्य नसल्यास त्यांना मतदानासाठी दोन-तीन तासांची सवलत द्यावी. मतदानासाठी सुटी अथवा सवलत न देणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात येणार आहे. या निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मुंबई शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरांसाठी दक्षता पथक स्थापन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाचा सामान्य प्रशासन विभाग आणि उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग यांनी याबाबतचा अध्यादेश जारी केला आहे. ही सार्वजनिक सुट्टी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात लागू आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील केंद्र व राज्य शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका आदींना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील. तसेच महानगरपालिका निवडणूक क्षेत्रातील मतदार शहराबाहेर कार्यरत असतील, तर त्यांनाही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ही सार्वजनिक सुटी लागू राहणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाच्या अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे.

…तर दोन-तीन तासाची सवलत

याबरोबरच उद्योग आणि कामगार विभागानेही सार्वजनिक सुटीबाबतचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित केले आहेत. उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने, खाजगी कंपन्यांतील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना, तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स , रिटेलर्स यांना सार्वजनिक सुट्टी लागू असेल. अपवादात्मक परिस्थितीत अनुपस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल अशा धोकादायक अथवा लोकोपयोगी सेवेत अथवा आस्थापनांच्या संदर्भात संबंधित अधिकारी, कर्मचारी व कामगारांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल, तर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुटीऐवजी दोन ते तीन तासांची विशेष सवलत द्यावी, असे अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे.

सुटी न दिल्यास कारवाईचा बडगा

मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील आस्थापनांनी मतदानाच्या दिवशी सुटी किंवा सवलत न दिल्यास दुकाने व आस्थापना खात्यामार्फत कार्यवाही करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई शहर, पूर्व उपनगरे व पश्चिम उपनगरे यासाठी दक्षता पथक नेमण्यात आले आहेत. नागरिकांनी दूरध्वनी क्रमांक – ९१२२-३१५३३१८७ यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

मतदारांनी मतदान करावे – आयुक्तांचे आवाहन

लोकशाही प्रक्रियेत जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टीचा निर्णय घेण्यात आला आहे. मतदानाच्या दिवशी कामाच्या कारणाने मतदार मतदानापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. मतदारांनी सक्रियपणे मतदान करून लोकशाहीच्या उत्सवात सहभाग नोंदवावा. गुरुवार, १५ जानेवारी रोजी प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी केले आहे.