BMC Election Update 2026: मतदानोत्तर चाचण्या आणि भाजपाच्या अंतर्गत सर्वेक्षण अहवालानुसार मुंबईत महायुतीला १३० ते १५५ जागा मिळतील, अशी शक्यता वर्तविण्यात आल्याने भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मुंबई महापालिकेतील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता मोडीत निघण्याची चिन्हे असून मुंबईत भाजपचा पहिला महापौर सत्तेवर येईल, असे चित्र आहे.

मतदानाची वेळ संपल्यानंतर खासगी दूरचित्रवाणी वाहिन्यांनी मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर केले. त्यानुसार भाजप व शिवसेना (एकनाथ शिंदे) महायुतीला १३०-१५५ जागा तर त्यापैकी भाजपला ८०-९० जागा मिळण्याचा अंदाज आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) व मनसे युतीला ५०-७० जागा मिळण्याचा अंदाज आहे. ठाकरे बंधू, मनसे व इतरांना १०० चा आकडा पार करणेही कठीण असून महायुती बहुमताचा ११४ आकडा आरामात पार करता येईल, असे अंदाज वर्तविण्यात येत आहेत. भाजपला शिंदे यांच्या तुलनेत दीड ते दुप्पट जागा मिळतील. शिंदे यांना ५० चा आकडा पार करणेही कठीण असल्याचे अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत.

भाजपने २२७ पैकी १३७ आणि शिवसेनेने (शिंदे) ९० जागा लढविल्या. भाजपचा स्ट्राईक रेट शिवसेनेपेक्षा अधिक राहण्याची शक्यता असून शिंदे यांनी लढविलेल्या निम्म्या जागा जिंकतानाही मुश्कील होण्याची चिन्हे आहेत. भाजप आणि शिवसेनेने जिंकलेल्या जागांमध्ये मोठा फरक राहणार असल्याने भाजपचाच महापौर होईल, असे ज्येष्ठ भाजप नेत्यांनी सांगितले. भाजपनेही खासगी कंपन्यांच्या माध्यमातून सर्वेक्षण केले असून भाजपला किमान ८०-९० जागा मिळतील आणि शिंदे यांना सुमारे ४० जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मतमोजणी उद्या (शुक्रवारी) पार पडणार असून भाजपच्या गोटात विजयोत्सवाची तयारीही सुरु करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

ठाकरेंची सत्ता जाणार ?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा रोवण्यात आला होता. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात शिवसेनेची महापालिकेवरील पकड ढिली झाली आणि भाजपची मुंबईतील ताकद वाढली. मुंबईतील मराठी मतदारांची संख्या कमी होवून गुजराती, उत्तर व दक्षिण भारतीय आदींची संख्या वाढली. त्यांनी भाजपला पसंती दिल्याने गेल्या काही वर्षात मुंबईत भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे ठाकरे यांचे महापालिकेतील वर्चस्व मोडीत काढण्याचे भाजपचे उद्दिष्ट या निवडणुकीत साध्य होण्याची चिन्हे आहेत.

महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेला ८४ व भाजपला ८२ जागा मिळाल्या होत्या. राज्यात युती सरकार असल्याने भाजपने त्यावेळी नरमाईची भूमिका घेवून ठाकरे यांना मुंबईचे महापौरपद आणि स्थायी समितीसह सर्व सत्ता दिली होती. यावेळी मात्र भाजप महापौरपद, स्थायी समितीसह महत्वाच्या समित्या आपल्या ताब्यात ठेवणार असल्याचे सूत्रांनी नमूद केले.