BMC Election Result Live Updates 2026 : राज्यातील २९ महापालिकांसाठी गुरुवारी (१५ जानेवारी) मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आज शुक्रवारी निवडणुकांचा निकाल जाहीर होत आहे. मुंबई महापालिकेत नेमकी कोणाची सत्ता येणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून प्राथामिक कल हाती आले आहे. मुंबईत भाजपा-शिंदे गट युती विरुद्ध ठाकरे बंधू असा चुरशीचा सामना रंगला आहे. यादरम्यान कोणत्या पक्षाला किती जागांची आघाडी मिळाली? जाणून घेऊ…

मुंबईत कोण आघाडीवर?

राज्य निवडणूक आयोगाने सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत भारतीय जनता पक्ष व शिंदे गटाच्या युतीचे जवळपास ८३ उमेदवार आघाडीवर आहेत. त्यापाठोपाठ ठाकरे बंधूंच्या युतीला ६७ जागांवर आघाडी मिळाली आहे. दुसरीकडे- काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या युतीचे १० उमेदवार आघाडीवर आहेत. मुंबईत काँग्रेसने आपल्या विजयाचे खाते उघडले असून प्रभाग क्रमांक १८३ काँग्रेसच्या उमेदवार विजयी झाल्या आहेत. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा पराभव केला आहे.

आणखी वाचा : मुंबई महापालिकेत कोण मारणार बाजी? ‘हे’ ७ मुद्दे ठरवणार सत्ता कोणाची!

भाजपा-ठाकरे गटात चुरशीचा सामना

विशेष बाब म्हणजे- मुंबईत भाजपा विरुद्ध उद्धव ठाकरे असा चुरशीचा सामना पाहायला मिळत आहे. शेवटचे कल हाती आले तेव्हा भाजपाला ६३ व शिंदे गटाला २० जागांची आघाडी मिळाली होती, तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना ६० व मनसेचे ७ जागांवरील उमेदवार आघाडीवर होते. एकंदरीत मुंबईत भाजपा-शिंदे गटाच्या युतीला ठाकरे बंधूंची युती चुरशीची लढत देताना दिसून येत आहे. मुंबई महापालिकेत एकूण २२७ प्रभाग आहेत. बहुतमाचा आकडा गाठण्यासाठी कोणत्याही पक्षाला ११४ जागांची आवश्यकता आहे.

मुंबईचा एक्झिट पोल काय सांगतोय?

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी जनमत एक्झिट पोलने आपला अंदाज वर्तवला आहे. भारतीय जनता पक्ष व शिवसेना शिंदे गटाच्या युतीला मुंबईत जवळपास १३८ जागा मिळणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्याचवेळी ठाकरे बंधू आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ ६२ जागांवरच समाधान मानावे लागेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे- प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीबरोबर युती करणाऱ्या काँग्रेसला २० जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याशिवाय इतर पक्षांना सात ते आठ जागा मिळेल, असा अंदाज जनमत एक्झिट पोलने वर्तवला आहे.

हेही वाचा : भाजपाला मोठा धक्का, महापालिकेत बहुमताचे स्वप्न भंगले; तिरुवनंतपुरममध्ये काय घडले?

मुंबईत कोणाचा महापौर बसणार?

एक्सिस माय इंडियाच्या अंदाजानुसार, मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा व शिवसेना शिंदे गटाच्या युतीला १३१ ते १५१ जागा मिळण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे पक्षांच्या युतीला ५८ ते ६८ जागांवर समाधान मानावे लागू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याचाच अर्थ उद्धव ठाकरेंच्या मुंबई महापालिकेतील सत्तेला इथे सुरुंग लागण्याची शक्यता आहे. दोन्ही ठाकरे बंधूंसाठी हा मोठा धक्का आहे. मुंबईत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला १२ ते १६ जागांवर यश मिळणार असल्याचा अंदाज आहे; इतर पक्षांसह अपक्षांच्या सहा ते १२ जागा जिंकून येण्याची शक्यता आहे.