मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त कार्यालयात सेवानिवृत्तीनंतरही विशेष कार्य अधिकारी पदावर नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याला उपायुक्तांनी विरोध केल्यानंतर आता सहाय्यक आयुक्तांनीही उपायुक्तांच्या बंडाला पाठिंबा दिला आहे. विशेष कार्यकारी अधिकाऱ्याला (ओएसडी) हटवण्यासाठी पालिकेतील उपयुक्तांपाठोपाठ आता २० सहाय्यक आयुक्तानीही ओएसडीना हटवण्यासाठी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवले आहे.
मुंबई महापालिकेच्या आयुक्त कार्यालयाचे सह आयुक्त चंद्रशेखर चोरे गेल्यावर्षी १ जानेवारी २०२५ रोजी सेवानिवृत्त झाले. मात्र चोरे यांना मुंबई महापालिकेत आयुक्त कार्यालयातच विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांच्या नियुक्तीमुळे मुंबई महापालिकेतील उपायुक्तांमध्ये त्यावेळीही नाराजी पसरली होती. चौरे यांना विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त केल्यामुळे त्या पदासाठी पात्र असलेल्या अधिकाऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली होती. त्यामुळे गेल्या तब्बल दहा महिन्यांपासून अधिकाऱ्यांमध्ये या विषयावर दबक्या आवाजात चर्चा सुरू होती.
मात्र आता येत्या ३१ डिसेंबरला चौरे यांचा एक वर्षाचा कालावधी संपणार आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा मुदतवाढ मिळू नये म्हणून मुंबई महापालिकेतील उपायुक्त प्रथमच एकवटले आहेत. महापालिकेतील १५ उपायुक्तांनी गेल्या आठवड्यात एक खरमरीत पत्र पालिका आयुक्त भूषण गगराणी आणि सामान्य प्रशासन विभागाचा कार्यभार असलेल्या अश्विनी जोशी यांना पाठवले होते. त्यापाठोपाठ आता मुंबई महापालिकेतील २० सहाय्यक आयुक्तानीही उपायुक्तांच्या लढ्याला पाठिंबा दिला. २० सहाय्यक आयुक्तांच्या स्वाक्षरी असलेले पत्र भूषण गगराणी यांना पाठवण्यात आले आहे.
उपायुक्त (आयुक्त कार्यालय) हे पद तत्काळ सहआयुक्त/उपायुक्त संवर्गातून भरण्याची मागणी सहाय्यक आयुक्तांनी पत्रात केली आहे. उपयुक्ताच्या मागणीला एकमताने पाठिंबा देत असल्याचे सहाय्यक आयुक्तांनी पत्रात म्हटले आहे.नियमित अधिकाऱ्याचे पद रिक्त ठेऊन तेथे समांतर अधिकाऱ्याची नेमणूक करणे ही बाब अन्यायकारक असून संवर्गातील अधिकाऱ्यांची पदोन्नती, सेवेचा कालावधी, अनुभव, निवडश्रेणी, वेतनश्रेणी यासाठी बाधा ठरणारी आहे. त्यामुळे उपायुक्त (आयुक्त कार्यालय) हे पद तत्काळ सहआयुक्त/उपायुक्त संवर्गातून भरावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, उपायुक्तांनी आयुक्तांना पत्र पाठवण्याआधी चौरे यांना हटवण्यासाठी बरेच प्रयत्न केले. सर्व अधिकाऱ्यांनी मिळून पालिका आयुक्तांची भेट घेण्याचाही प्रयत्न केला. मात्र त्याला आयुक्तांनी दाद दिली नाही, असे काही उपायुक्तांचे म्हणणे आहे. त्यामुळे उपायुक्तांमधील राग अधिकच उफाळून आला आहे. त्यानंतर सर्व उपायुक्तांनी मिळून प्रत्यक्ष चौरे यांचीही भेट घेऊन स्वत:हून राजीनामा द्यावा अशीही विनंती केली होती. मात्र चौरे यांनी कोणाचेच न ऐकल्यामुळे हे प्रकरण अधिकच चिघळत गेले. त्यामुळे येत्या काळात पालिका आयुक्त विरुद्ध सर्व अधिकारी असे शीतयुद्ध पेटणार यात शंका नाही.
उपायुक्तांच्या पत्रानंतरही पालिका आयुक्तांनी काहीही निर्णय न घेतल्यामुळे सहाय्यक आयुक्तही या लढाईत उतरले आहेत. तसेच येत्या काळात या विषयाला राजकीय रंग येण्याचीही शक्यता वर्तवली. चौरे यांचे पालिका आयुक्त कार्यालयात बस्तान बसले असून ते मनमानी कारभार असल्याची अधिकाऱ्यांमध्ये चर्चा आहे.
