मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या ‘पादचारी प्रथम’ उपक्रमाअंतर्गत शहर विभागातील ‘सी’, ‘डी’ आणि ‘ई’ विभाग कार्यालयांनी संयुक्तरित्या दक्षिण मुंबईमधील गजबजलेल्या एम. एस. अली रोडवर अतिक्रमणावर हातोडा चालविला. या कारवाईत २१ अनधिकृत वाढीव बांधकामे, आठ ओटे, चार पाण्याच्या अनधिकृत टाक्या, २२ अनधिकृत तात्पुरत्या ताडपत्रीच्या शेड हटविण्यात आल्या. तसेच ६८ अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यात आली.

मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त आश्विनी भिडे यांनी ‘पादचारी प्रथम’ अभियानाची घोषणा केली असून या अभियानाअंतर्गत प्रत्येक परिमंडळातील सात रस्त्यांवरील अतिक्रम हटविण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. आश्विनी भिडे आदेशानुसार महानगरपालिकेच्या ‘सी’, ‘डी’ आणि ‘ई’ विभागांनी बुधवारी संयुक्तरित्या एम. एस. अली रोडवरील अतिक्रमणांवर हातोडा चालविला. अतिरिक्त महापालिका आयुक्त प्राजक्ता वर्मा-लवंगारे, परिमंडळ १ च्या उपायुक्त चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ‘डी’ विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संतोष साळुंखे, ‘सी’ विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनील माने, ‘ई’ विभागाचे सहाय्यक आयुक्त अनंत कंकाळ यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. तसेच व्ही. पी. रोड पोलीस ठाणे आणि नागपाडा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कडेकोट बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.

या कारवाईत २१ ठिकाणची अनधिकृत वाढीव बांधकामे, आठ अनधिकृत फुलांचे कट्टे / ओटे, चार अनधिकृत पाण्याच्या टाक्या, २२ अनधिकृत तात्पुरत्या ताडपत्रीच्या शेड, हटविण्यात आल्या. त्याचबरोबर ६८ अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यात आली.

या कारवाईदरम्यान निर्माण झालेला राडारोडा, अन्य साहित्य हटविण्यासाठी तीन डंपरचा वापर करण्यात आला. एक जेसीबी, देखभाल विभागाचे दोन ट्रक, अतिक्रमण विभागाचे दोन ट्रकचा कारवाईसाठी वापर करण्यात आला. तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागातील ६०, देखभाल विभागातील १२, तर अतिक्रमण विभागातील आठ कामगार या कारवाईत सहभागी झाले होते. अनधिकृत बांधकामातून आणि अतिक्रमीत साहित्याचा एकूण २० मेट्रीक टन कचरा हटविण्यात आला.