मुंबई : मुंबई महापालिकेतील अभियंत्यांच्या बदल्यांमागील कथित आर्थिक व्यवहाराला आळा घालण्यासाठी अभियंत्यांच्या बदली आणि पदोन्नती प्रक्रियेसाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याची मागणी अभियंत्यांच्या संघटनेने केली आहे. बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनीअर्स युनियनने महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांना याप्रकरणी पत्र देऊन तात्काळ समिती स्थानप करण्याची मागणी केली आहे.
मुंबई महापालिकेतील सहाय्यक अभियंता व दुय्यम अभियंता पदावरील अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या बदल्यांचे प्रकरण ऑक्टोबर २०२५ मध्ये खूप गाजले होते. या बदल्यांमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत बदल्यांना तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर अभियंत्यांच्या बदली आणि पदोन्नती प्रक्रियेसाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याची मागणी संघटनेने आयुक्तांकडे केली आहे.
बदल्यांसाठी एआयची मदत
मुंबई महानगरपालिकेत विविध खात्यांमध्ये मिळून सुमारे ४ हजार ५०० अभियंते कार्यरत आहेत. नियमानुसार अभियंत्यांची दर तीन वर्षांनी बदली होणे आवश्यक आहे. त्यामुळे अभियंत्यांच्या बदलीसाठी पारदर्शक पद्धतीची मागणी संघटनेने केली आहे. याकरीता सॉफ्टवेअर व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) मदतीने ही प्रक्रिया सुलभपणे राबवता येऊ शकते, अशीही सूचना यात करण्यात आली आहे.
समिती स्थापन करावी
दरम्यान, या प्रक्रियेसाठी संचालक (अभियांत्रिकी व सेवा) यांच्या अध्यक्षतेखाली ४ ते ५ मुख्य अभियंत्यांचा समावेश असलेली समिती स्थापन करून प्रणालीद्वारे तयार झालेल्या यादीची छाननी करावी. आवश्यकतेनुसार लहान प्रमाणात बदल करण्याचा अधिकारही समितीला असावा, अशी मागणी संघटनेचे कार्याध्यक्ष साईनाथ राजाध्यक्ष यांनी केली आहे. तसेच बदल्यांचा कथित बाजार बंद करावा अशीही मागणी त्यांनी केली आहे. तसेच, अभियंत्यांच्या पदोन्नती व भरती प्रक्रियेतही विलंब होत असून २ ते ३ वर्षांचा उशीर होत असल्यामुळे महापालिकेच्या कामकाजावर परिणाम होत आहे, असेही या पत्रात म्हटले आहे.
बदल्यांसाठी ऑनलाइन प्रक्रिया
यापुढे खात्याअंतर्गत अभियंत्यांच्या बदली प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. संचालक (अभियांत्रिकी व सेवा) यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती बदल्यांबाबत निर्णय घेईल, असे मुंबई महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. भविष्यातील बदली प्रक्रियेच्या अनुषंगाने, राज्य शासनाच्या धर्तीवर (वाहतूक विभाग, पशुवैद्यकीय विभाग) सॉफ्टवेअर विकसित करण्यात येईल. त्या माध्यमातून अभियंत्यांची बदली प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पाडण्यात येईल, जेणेकरून बदली प्रक्रियेत पारदर्शकता येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.
