मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीएमसीमधील बदली घोटाळ्यात हस्तक्षेप करून तो थांबवून सात महिन्यांहून अधिक कालावधी लोटल्यानंतर आता महापालिका पुन्हा नियमित बदल्यांच्या नावाखाली तोच बदली घोटाळा होत असल्याचा आरोप भाजपचे आमदार मिहीर कोटेचा यांनी केला आहे. त्यात ५५ अभियंत्याची नावे वादात सापडण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिकेतील सहाय्यक अभियंता व दुय्यम अभियंता पदावरील अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या बदल्यांचे प्रकरण ऑक्टोबर २०२५ मध्ये खूप गाजले होते. उपअभियंते आणि सहाय्यक अभियंत्यांसह १६१ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले होते. या बदल्यांमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचे आरोप झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत बदल्यांना तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता सात महिन्यानंतर पुन्हा एकदा असाच घोटाळा होत असल्याचा आरोप आमदार मिहीर कोटेचा यांनी केला आहे.

५५ अभियंते वादात का?

याप्रकरणी कोटेचा यांनी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र लिहिले असून आयुक्तांनी हस्तक्षेप करण्याची मागणी केली. कोटेचा यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, मुंबई महापालिकेत आता नव्या बदल्यांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही प्रक्रिया नियमित प्रशासकीय बदल्यांच्या स्वरूपात दाखवली जात आहे. मात्र प्रस्तावित यादीतील सुमारे ५५ अधिकाऱ्यांना पूर्वीच्या ऑक्टोबर बदली यादीतीलच पदस्थापना दिली जात आहे. ही यादी कोटेचा यांनी आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे सादर केली आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांच्या स्वाक्षऱ्या अद्याप या आदेशांवर झालेल्या नाहीत.

बदल्यासाठी आर्थिक व्यवहार….

मुंबई महापालिकेतील अभियंत्यांच्या बदल्यांमागील कथित आर्थिक व्यवहार होत असल्याचे आरोप वारंवार होतात. या ‘कॅश फॉर पोस्टिंग’ घोटाळ्यात वरिष्ठ बीएमसी अधिकाऱ्यांकडून विविध श्रेणीतील बदल्या आणि पदोन्नतीसाठी ५ लाख ते ४० लाख रुपये घेतल्याचे गंभीर आरोप झाले होते.

तीन बदल्याची प्रक्रिया पूर्ण..

सुमारे तीन अधिकाऱ्यांची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्याचा आरोप कोटेचा यांनी केला आहे. मात्र याबाबतचा प्रस्ताव अद्याप अतिरिक्त महापालिका आयुक्त आणि महापालिका आयुक्तांकडे पोहोचलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ५५ अधिकाऱ्यांना पुन्हा पूर्वी प्रस्तावित करण्यात आलेल्या त्याच पदांवर नियुक्त करण्याचा प्रयत्न होत असून हा बदली घोटाळा पुन्हा सुरू होत असल्याचा आरोप कोटेचा यांनी केला आहे.