मुंबई : मुंबईत प्रदूषणाचे प्रमाण सातत्याने वाढत असून प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे मुंबईच्या पर्यावरण व वातावरणीय बदलासंबंधात समतोल राखण्यासाठी कृती आराखडा तयार करणे आवश्यक असून महापालिकेत ‘पर्यावरण व वातावरणीय बदल समिती’ या नावाने वैधानिक समिती स्थापन करण्यासाठी महापौर रितू तावडे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यासाठी महापालिका अधिनियमात सुधारणा करण्यासाठी राज्य शासनाकडे निवेदन सादर करण्याबाबत शिवसेनेचे (ठाकरे) नगरसेवक अंकित प्रभू यांनी ठरावाची सूचना केली होती. त्याला महापौर तावडे यांनी मंजुरी दिली.

पर्यावरण आणि वातावरणीय बदल हे पृथ्वीवरील जीवसृष्टीसमोरील सर्वात मोठे धोके आहेत. औद्योगिकीकरण, जंगलतोड आणि जीवाश्म इंधनांच्या अतिवापरामुळे हरितगृह वायूंचे उत्सर्जन वाढून, पृथ्वीचे तापमान वाढत आहे. परिणामी, समुद्रकिनारी वसलेल्या या महानगराला वातावरणीय बदलामुळे, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, अवर्षण, उष्णतेच्या लाटा, नागरी प्रदूषण अशा विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पर्यावरणाप्रती नागरिकांचा निष्काळजीपणा हा पर्यावरणाचा समतोल बिघडविण्यासाठी तितकाच कारणीभूत आहे.

अद्ययावत सुधारित मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ च्या कलम ६१ (अब) अन्वये नागरी वनीकरण, पर्यावरण संरक्षण व परिस्थिती या गोष्टीस चालना देणे हे महानगरपालिकेचे बंधनकारक कर्तव्य आहे. महानगरपालिका प्रशासनाच्या वेगवेगळ्या यंत्रणा पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी कार्यरत असल्या तरी, त्या यंत्रणांमध्ये सुसंगतीचा अभाव दिसून येत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा मुद्दा हा वेगवेगळ्या ठिकाणी मांडावा लागतो. त्यामुळे मुंबई महानगरातील पर्यावरणाचा प्रश्न सोडविण्यासाठी, पर्यावरणाशी निगडीत प्रश्न एकाच ठिकाणी मांडता यायला हवे.

मुंबई शहराच्या पर्यावरण व वातावरणीय बदलासंबंधात समतोल राखण्यासाठी एक कृती आराखडा तयार करणे तसेच त्यावर परिणामकारक उपाययोजना करण्यासाठी ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे. त्यासाठी महानगरपालिकेत ‘पर्यावरण व वातावरणीय बदल समिति’ या नावाची वैधानिक समिती स्थापन करण्यासाठी मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ मध्ये सुधारणा करण्याबाबत अंकित प्रभू यांनी ठरावाची सूचना केली होती.