मुंबई : मीरा भाईंदर आणि दहिसर यांना जोडणाऱ्या दहिसर भाईंदर उन्नत जोडरस्ता प्रकल्पाच्या निविदेला पाचव्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. पूर्व मुक्तमार्ग लवकरच ग्रॅंटरोडला जोडण्यात येणार असून त्यासाठी मागवलेल्या निविदेलाही दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. निविदाकारांकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे या मोठ्या प्रकल्पांच्या निविदांना वारंवार मुदतवाढ दयावी लागते आहे. दहिसर भाईंदर उन्नत जोडरस्ता हा मुंबई महापालिकेचा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. सागरी किनारा मार्गावरून येणारी वाहतूक पुढे या मार्गावरून जाऊ शकणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईतून भाईंदर आणि वसई विरारकडे जाण्यासाठी आणखी एक पर्याय येत्या काळात उपलब्ध होणार आहे.
हेही वाचा >>> Apple WWDC 2023 Live: iOS 17 अपडेटमध्ये मिळणार कॉन्टॅक्ट पोस्टर फिचर, महत्वाच्या अपडेट्स एकाच क्लिकवर




या प्रकल्पांतर्गत दहिसर पश्चिमेला कांदरपाडा मेट्रो स्थानकापासून ते भाईंदर पश्चिमेकडील उत्तनपर्यंत एक नवीन रस्ता बांधण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिका आणि एमएमआरडीए ही दोन प्राधिकरणे मिळून हा पाच किमीचा उन्नत मार्ग बांधणार आहेत. त्यासाठी सुमारे तीन हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मुंबई महापालिकेने त्यासाठी ऑक्टोबर २०२२ मध्ये पहिल्यांदा निविदा मागवल्या होत्या. त्यानंतर वेळोवेळी निविदा भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. निविदा भरण्याची मुदत आता ७ जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. अतिशय मोठ्या आणि खर्चिक अशा या प्रकल्पासाठी निविदा भरण्याची पहिली मुदत १० मार्चला संपली. त्यानंतर पहिल्यांदा दोन आठवड्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत २४ मार्चला संपली. मात्र निविदाकारांचा पुरेसा प्रतिसाद न आल्यामुळे या निविदेला आता पाचव्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे.
हेही वाचा >>> मुंबई विद्यापीठाकडून पुनर्मूल्यांकन अर्जाची ऑनलाइन प्रक्रिया सुरु; उन्हाळी सत्रातील परीक्षेच्या निकालासंबंधित अर्ज करता येणार
या निविदेतील अटीनुसार कंत्राटदाराला या प्रकल्पाचे संपूर्ण नियोजन करावे लागणार आहे. हा रस्ता कांदळवनातून व खाडी परिसरातून जाणारा असल्यामुळे त्याकरीता पर्यावरणीय परवानग्यांचीही आवश्यकता भासणार आहे. हा रस्ता सुमारे ४५ मीटर रुंद असेल व त्यामध्ये चार आणि चार अशा आठ मार्गिका वाहनांसाठी असतील. प्रकल्पाची अंदाजित रक्कम २५७४ कोटी असेल तर एकूण सर्व खर्च धरून ही रक्कम ३१८६ कोटी असेल असा अंदाज आहे.
पूर्व मुक्तमार्ग ग्रँटरोडला जोडण्याच्या प्रकल्पासाठीही कंत्राटदार पुढे येईना पी डिमेलो रस्त्यापर्यंत असलेला पूर्व मुक्तमार्ग लवकरच ग्रॅंटरोडला जोडला जाणार आहे. पी डिमेलो मार्ग ते ग्रॅंटरोड स्थानक असा ५.६ किमी लांबीचा पूल बांधण्याचे पालिका प्रशासनाने ठरवले आहे. त्यामुळे पूर्व मुक्तमार्गावरून सुसाट येणारी वाहने पुढे पी डिमेलो मार्गानंतर थेट ग्रॅंटरोडपर्यंत येऊ शकतील. या कामासाठी ६६२ कोटींचा खर्च अपेक्षित असून त्यासाठी पालिका प्रशासनाने फेब्रुवारी महिन्यात निविदा मागवल्या. त्यालाही दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे.