मुंबई : मुंबई महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात बिघाड झाल्यामुळे अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याचा खोटा संदेश वारंवार समाजमाध्यमांवर फिरत असून या संदेशामुळे मुंबई महापालिका प्रशासनाला डोकेदुखी झाली आहे. या संदेशाला वारंवार समाजमाध्यमांवर उत्तर देण्याचे काम सध्या प्रशासनाच्या ऑनलाईन टीमला करावे लागत आहे.
जलशुद्धीकरण केंद्रातील गाणळ यंत्रणेत (फिल्टर यंत्र) बिघाड झाल्यामुळे महानगरपालिकेतर्फे पाणी फिल्टर न करता सोडण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील तीन – चार दिवस पाणी उकळून प्यावे अशा स्वरुपाचा खोटा व खोडसाळ संदेश समाजमाध्यमांवरून अधूनमधून प्रसारित होत आहे. मुंबई महापालिकेचे बोधचिन्ह वापरून थोड्या दिवसांनी वारंवार पाठवल्या जाणाऱ्या या संदेशामुळे मुंबई महापालिका प्रशासनाची प्रतिमा मलीन होते आहे. तसेच या संदेशाची खातरजमा करण्यासाठी वारंवार मुंबई महापालिकेच्या यंत्रणेकडे दूरध्वनी करण्यात येत आहे. मुंबई महापालिका प्रशासनाने हा संदेश चुकीचा असल्याचे स्पष्टीकरण समाजमाध्यमावरून दिले आहे.
मुंबई महापालिकेचे म्हणणे काय ?
मुंबईकरांना दररोज शुद्ध, निर्जंतुकीकरण केलेल्या आणि पूर्णपणे स्वच्छ पाण्याचा पुरवठा केला जातो. पाणीपुरवठा यंत्रणा सुरळीत कार्यरत असून त्यामध्ये कोणताही बिघाड झालेला नाही, असे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे. समाजमाध्यमावरील अशा खोट्या व दिशाभूल करणाऱ्या संदेशापासून सावध राहावे, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
मुंबईचे पाणी ९९.३४ टक्के शुद्ध
मुंबईकरांना निर्जंतुकीकरण आणि इतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून पाणीपुरवठा करण्यात येते. मुंबई महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रांतून पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याचा दर्जा ९९.३४ टक्के इतका सर्वोत्तम असल्याचे केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन कार्यक्रमातून सिद्ध झाले आहे. सर्वोत्तम पाणीपुरवठ्यासाठी मुंबई महानगरपालिका कटीबद्ध आहे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.